Nashik Nagar News : अहमदनगर (Ahmednagar) शहरातील नागरिकांसाठी नव्या वर्षाचे अनोखे गिफ्ट मिळाले असून शहरवासीयांना मुबलक पाणी 9Water Supply) वापरता येणार आहे. येत्या मार्च महिन्यापासून 24 तास पाण्याची सुविधा होणार असल्याने अहमदनगरकरांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. याबाबतची माहिती खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिली आहे. 


अहमदनगर शहरासाठीच्या अमृत पाणी योजनेच्या (Amrut Pani yojna) जलवाहिनीचे काम जवळपास पूर्ण झाले असून येत्या जानेवारी अखेरपर्यंत योजनेसाठी लागणारे पंप आणि मोटारी बसवल्या जाणार आहेत. त्यानंतर फेज टू योजनेत उभारलेल्या टाक्यांमधील पाणी सोडून वितरणाची चाचणी फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत केली आहे. मार्च 2023 पासून नव्या जलवाहिनीवरून नगरकरांना नळ कनेक्शन देऊन 24 तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले. याबाबत अहमदनगर महापालिकेत फेज टू आणि अमृत पाणी योजनेचा आढावा खासदार सुजय विखे पाटील यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. 


नगर शहरातील मूलभूत प्रश्नांबाबत आम्ही पाठपुरावा करत असून नगरकरांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सर्व पक्षीय नगरसेवकांनी या आढावा बैठकीसाठी सहभाग नोंदवला. आता मार्चपर्यंत आपण नगरकरांना 24 तास पाणी पुरवठा करणार आहोत असं सुजय विखे पाटील यांनी सांगितले. अमृत योजनेत मुळा धरणापासून वसंत टेकडीपर्यंत पाईप टाकण्याचे काम अवघे 12 मीटरचे शिल्लक आहे. खासगी जागेतून हे काम होणार असल्याने संबंधितांशी बोलून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा विषय मार्गी लागेल असा विश्वास खासदार विखे यांनी व्यक्त केला. अहमदनगर शहराला 24 तास पाणीपुरवठा व्हावा यासाठी विविध पक्ष आणि नगरकरांनी सातत्याने प्रयत्न केले. शहराला पाणी पुरवठा करण्याचा स्रोत मुळा धरण आहे.सध्या अहमदनगर शहरात जवळपास 65 हजार नळ कनेक्शन आहेत. 


जवळपास तीन लाख लोकसंख्या असलेल्या नगरशहराला सध्या दिवसआड किमान एक तास पाणी पुरवठा होत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाणीपुरवठा झालेला नाही. मात्र आता, फेब्रुवारी अखेरपर्यंत हे काम झाल्यावर नव्या पाईपलाईनवर नळ कनेक्शन दिले जाणार आहे. नव्या पाईपलाईनवरील नळ कनेक्शन बंद करून नव्या पाईपलाईनवर कनेक्शन घेताना नगरकरांना पैसे भरावे लागणार आहेत. तसा निर्णय मनपा महासभेने घेतला आहे. संबंधित नळ कनेक्शनसाठी सध्यातरी मीटर बसविण्याचा निर्णय झाला नसला तरी भविष्यात तसा निर्णय होऊ शकतो. मात्र, खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे मार्च पर्यंत सर्व अडचणींवर मात करून पाणीपुरवठा झाला तर ही नक्कीच नगरकरांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे.