कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी इथे कर्जवसुलीसाठी आलेल्या पथकाला ठेवीदार आणि कर्जदारांनी धारेवर धरलं. कारण तब्बल 10 वर्षानंतर बांबवडे नागरी पतंस्थेचे अधिकारी कर्जवसूलीसाठी प्रकट झाले.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी इथे कालिका नागरी पतसंस्था 20 वर्षांपूर्वी सुरु होती. 2002 साली ती बंद पडली. परिसरातील अनेकांच्या इथे ठेवी होत्या, तर कुणी कर्ज घेतलं होतं.

संचालक मंडळाने त्यावेळी हात वर केले. त्यानंतर 4 वर्षांनी बांबवडे नागरी पतसंस्थेत कालिना नागरी पतसंस्था विलीन करण्यात आली. आता पतसंस्थेने थकबाकी वसुलीला सुरुवात केली आहे.

बऱ्याच लोकांनी कर्ज भरुनही त्याची नोंद कालिका पतंस्थेने ठेवली नाही. तत्कालीन संचालक मंडळाने बोगस कर्ज प्रकरणं केल्याचाही आरोप आहे. पूर्वी ज्यांच्यावर फक्त 3 हजार, 15 हजार रुपये कर्ज होतं. अशांना एक ते दोन लाख रुपये भरण्याची नोटीस आली आहे.

नियमानुसार ज्यांनी कर्ज थकवली आहेत, अशा कर्जदारांकडून वसुली सुरु आहे. ज्यांच्या ठेवी आहेत. त्या परत दिल्या जात असल्याचा दावा बांबवडे पतसंस्थेने केला आहे.

कालिका पतसंस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळाने बोगस कर्ज प्रकरणं केल्याचा आरोप आहे. अशा स्थितीमध्ये लोकांना नाहक त्रास का दिला जातोय, हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रकरणाची सहकार खात्याने चौकशी करुनच लोकांकडून थकबाकी वसूल करावी अशी लोकांची अपेक्षा आहे.