अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद कशामुळे गेलं? काँग्रेसमध्येच ओढाताण
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2017 05:55 PM (IST)
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं पद जाण्यामागे काँग्रेस आमदाराने एक कारण सांगितलं, तर काँग्रेस प्रवक्त्यांनी वेगळं कारण सांगितलं.
नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद नेमकं कशामुळे गेलं, यावरुन आता काँग्रेसमध्येच ओढाताण सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपद जाण्यामागे काँग्रेस नेत्यांकडूनच वेगवेगळी कारण सांगितली जात आहेत. सध्या नांदेड महापालिका निवडणुकीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. लातूर प्रमाणे नांदेड महापालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांना मैदानात उतरवलं आहे. नांदेड आणि लातूरचे संबंध विभागीय कार्यालयावरून ताणले गेले होते. निलंगेकर हे लातूरचे असल्याने काँग्रेसने नांदेड महापालिका प्रचारात विभागीय आयुक्त कार्यालयाचा मुद्दा ऐरणीवर आणला. या सर्वात काँग्रेसची चांगलीच गोची झाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू आमदार अमर राजूरकर यांनी काँग्रेसच्या फेसबुक पेजवर “विभागीय आयुक्त कार्यालयासाठी अशोक चव्हाणांनी स्वत:चा बळी दिला” असा शोध लावला. दुसरीकडे अमर राजूरकर यांच्या शेजारी बसलेल्या काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आदर्श घोटाळ्यामुळे अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपद गेल्याचं संगितलं. त्यामुळे अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद नेमकं कशामुळे गेलं, याची चर्चा आता सुरु झाली आहे.