मुंबई : अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांबाबत (Sharad Pawar) केलेल्या वक्तव्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळत असतानाच, यात आता अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी उडी घेतली आहे. मुश्रीफ यांनी आव्हाड यांच्यावर जोरदार टीका करत, 'जितेंद्र आव्हाड हा अत्यंत घाणेरडा माणूस' असल्याचे म्हटले आहे.
आव्हाड यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देतांना म्हटले आहे की, "जितेंद्र आव्हाड हा अत्यंत घाणेरडा माणूस आहे. केवळ अजित पवार यांच्यावर टीका करत राहणं एवढंच त्याचं काम आहे. आता ठाण्यामध्ये जी घटना घडली त्याच्यावर ते का बोलत नाही. याचा उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी मला द्यावे. केवळ अजित पवारांवर बोलत राहणं एवढंच त्यांचं काम आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ जितेंद्र आव्हाड यांनी लावला असल्याचे देखील मुश्रीफ म्हणाले आहेत.
निवासी डॉक्टरांनी संप मागे घ्यावा...
राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी 7 फेब्रुवारीपासून संपावर जाण्याची घोषणा केली आहे. यावर बोलतांना मुश्रीफ म्हणाले की, “डॉक्टरांनी संप मागे घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. कारण यावर आमची बैठक झालेली आहे. त्यांची तात्काळ निवासाची व्यवस्था करावी यासाठी भाड्याने इमारती घेण्याच्या सूचना देखील मी सर्व राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रमुखांना सूचना केल्या आहेत. त्यांच्या वेतनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक लावली आहे. ही मागणी देखील त्यांची लवकरच पूर्ण केली जाईल, असे मुश्रीफ म्हणाले आहेत.
शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण...
अजित पवारांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले. त्यांच्या याच आरोपांवर अजित पवारांनी खुलासा केला आहे. 'काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे, असे अजित पवारांनी ट्वीट केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: