Jayant Patil on Gulabrao Patil Statement: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मित्रपक्षांमध्ये असलेली धुसफूस दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाबद्दल बोलल्यानंतर महायुतीत सुरू असलेली अंतर्गत धुसफूस दिसून येत आहे. अशातच काल(शुक्रवारी) शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अजित पवार हाताळत असलेल्या अर्थखात्याबाबत धक्कादायक विधान केलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement


आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अशी टीका करणे योग्य नाही. पण, अशी टीका करुन महायुतीमधून अजित पवार यांना बाहेर काढून शिवसेनाला जास्त जागा महायुती मिळाव्या असा काही त्यांचा प्लॉन असेल असंही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीतील विशेषत शिवसेनेचे नेते अजित पवार यांच्यावर वारंवार बोलताना दिसत आहेत. अशातच काल (शुक्रवारी) मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अर्थखात्याबाबत धक्कादायक विधान केलं त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही असं गुलाबराव पाटील म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. 


काय म्हणाले गुलाबराव पाटील?


अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही. अनेक वेळा नकाराचा शेरा मिळून फाईल परत येत असे. परंतु, पाठपुराव्यामुळे आमचे काम झाले. दोन अडीच महिन्यात येणारे विघ्न दूर करण्यासाठी प्रयत्न करा. स्वार्थाबरोबर परमार्थही साधावा लागतो, असं  गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. जळगाव येथे शनिवारी हातपंप आणि वीजपंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी संघटनेच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) बोलत होते. 


 तानाजी सावंत काय म्हणाले होते? 


आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. आयुष्यात कधी आपले काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आज जरी कॅबिनेटमध्ये पटलेले नाही. राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, आपल्याला त्यांची अॅलर्जी आहे, असं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केल्याचं व्हायरल व्हिडिओतून समोर आलं होतं.


तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधतानाचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये ते म्हणतात, अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादीची आपल्याला अॅलर्जी आहे. पुडी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असंही सावंत म्हणाले होते.