अहमदनगर : येथील नेप्ती कांदा मार्केट (Onion Market) समोर कांदा व्यापार्‍यावर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. व्यापार्‍यावर धारदार शस्त्राने वार करून त्याच्या जवळील सुमारे 50 लाख रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली आहे. यामुळे अहमदनगरमध्ये (Ahmednagar Crime News) एकच खळबळ उडाली आहे. 


आडत आणि कांदा व्यापारी समीर सय्यद हे नेप्ती मार्केटकडे येत असताना बायपास रोडवर त्यांना काही दरोडेखोरांनी घेरले. यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांच्याकडील 50 लाखांची रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या प्राणघातक हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाले आहेत.  


अहमदनगरमध्ये भरदिवसा कांदा व्यापाऱ्यावर हल्ला


व्यापाऱ्याला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेने अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) आणि भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डीले (Shivaji Kardile) जखमी व्यापार्‍याची भेट घेतली. चोरट्यांचा तातडीने शोध घेतला नाही तर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. 


आरोपींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी


भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डीले म्हणाले की, शेतकऱ्याला बाजार समितीत रोख रक्कम द्यावी लागते. त्या शेतकऱ्याने सुमारे 50 ते 60 लाख रुपये बँकेमधून काढून आणले. नेप्ती बाजार समितीचा आज लिलाव असल्याने ते आज बाजार समितीत दाखल होत असताना चार-पाच हल्लेखोरांनी शेतकऱ्याला मारहाण केली. त्याच्यावर वार करून रक्कम घेऊन लंपास झाले. याबाबत आम्ही एसपींची भेट घेऊन तातडीने या प्रकरणाचा तपास लावावा आणि आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणार आहोत. शेतकऱ्याची गेलेली रक्कम परत मिळायला हवी, अशीही मागणी आम्ही करणार आहोत. या गोष्टीचा तपास लागला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 


...तर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप म्हणाले की, बाजार समिती परिसरात सातत्याने छोट्या मोठ्या घटना घडत असतात. याबाबत अनेक तक्रारी देखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या आहेत. आजही एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत सुदैवाने ते बचावले. मात्र, त्यांच्याकडील मोठी रक्कम दरोडेखोरांनी पळवून नेली. या घटनेनंतर व्यापारी बांधव, मार्केट कमिटीचे पदाधिकारी एकत्र जमले आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत लवकरात लवकर तपास लागला नाही, घटनेतील आरोपींवर योग्य ती कारवाई झाली नाही तर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 


आणखी वाचा 


Pune Crime News: 'मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधून...'; शाळेत 19 अल्पवयीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून विनयभंग; पुण्यातील संतापजनक घटना