Jayakwadi Dam: राज्यात जोरधारांनी धरणसाठ्यात मोठा फरक पडल्याचं चित्र आहे. मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात आतापर्यंत तब्बल 55 टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग झाल्याने जायकवाडी धरणाचा आज गुरुवारी सकाळपर्यंत 69.89 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.  जायकवाडी धरणानं 65 टक्कयांची मर्यादा ओलांडल्याने आता नाशिक नगरच्या धरणांमधून होणारा समन्यायी पाणीवाटपाचा तेढ यंदा सुटला आहे.


समन्यायी पाणीवाटपाच्या निकषानुसार, पावसाळा संपेपर्यंत जायकवाडी धरणात 65 टक्के पाणी न भरल्यास गोदावरी खोऱ्यातील नाशिक, नगरच्या धरणांमधून पाणी सोडावे लागते. हे पाणी सोडण्यासाठी नाशिक, नगरमधून पाणी सोडण्याासाठी मोठा विरोध होतो. मागील वर्षी जायकवाडीत अपेक्षीत साठा नसल्याने दुष्काळ ओढवला होता. परिणामी समन्यायी पाणीवाटपानुसार नाशिक, नगरच्या धरणांमधून पाणी सोडण्यात आले होते. आता यावेळी जायकवाडी पावसाळ्यात ६९ टक्क्यांनी भरल्यानं पाणीवाटपाचा संघर्ष यावर्षीपुरता तरी थांबणार आहे.


नाशिक नगरच्या पावसामुळे जायकवाडीत मोठा विसर्ग


नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने धरणसाठ्यात मोठा पाणीसाठा झाला आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये आतापर्यंत 34 हजार सहा दशलक्ष घनफूट पाणीसाठा तर नगरमधील धरणांमधून 21 हजार 600 दलघमी पाणीसाठा जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आला आहे. परिणामी जायकवाडी धरण 65 टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. गुरुवारी(29 aug) सकाळी जायकवाडी धरणात 69.89 टक्के पाणीसाठा होता. 


जायकवाडी धरणात पाणीसाठा वाढतोय


मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने जायकवाडीचा पाणीसाठा वाढल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले आहे. मागील वर्षी अवघे 33.24 टक्के भरलेले जायकवाडी धरण यंदा 69.89 टक्क्यांनी भरलं आहे. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागली असून धरणसाठ्यात समाधानकारक साठा आहे.  काही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत असून यंदा पिण्याच्या पाण्याचा  प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणाची क्षमता 102.72 टीएमसी आहे. अजूनही सुमारे 56 हजार क्यूसेक आवक धरणात सुरू असल्याने साठा मोठ्या प्रमाणात वाढण्याची खात्री निर्माण झाली आहे.


हेही वाचा:


यंदा बैल पोळा पावसात साजरा होणार, बळीराजाच्या स्वागताला वरुणराजा बरसणार, पंजाबराव डखांनी वर्तवला हवामान अंदाज