Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला रॉक्सच्या उत्तरेला काही अंतरावर कृष्णा या बार्जला जोवाड चक्रिवादळाचा फटका बसला आहे. जोवाड चक्रिवादळामुळे अरबी समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि समुद्र खवळलेल्या स्थितीत असताना जयगडवरून गोव्याला निघालेलं कृष्णा हे बार्ज सिंधुदुर्गाच्या सागरी हद्दीततून गोव्यात जाताना बुडायला लागलं. यावेळी या कृष्णा बार्ज वर 10 क्रू मेंबर उपस्थित होते. बार्ज बुडत असल्यानं या 10 क्रू मेंबर्सनी समुद्रात उडी मारली. 


जोवाड चक्रिवादळाच्या प्रभावामुळे समुद्र आधिकच खवळलेला होता. यावेळी या क्रू मेंबर्सनी समुद्रात उड्या टाकल्या. तेव्हा जवळपास केरळमधील काही नौका मासेमारीसाठी समुद्रात होत्या. त्यांनी यातील 3 क्रू मेंबर्सना वाचवलं. तर गोवा तटरक्षक दलाने 2 जणांना वाचवलं. या 5 क्रू मेंबर्सना गोवा तटरक्षक दलाच्या चेतक हेलिकॉप्टरनं गोव्यात नेण्यात आलं.


जोवाड चक्रिवादळामुळे समुद्रातील खराब हवामानाचा सामना कृष्णा बार्ज वरील 10 सदस्यांना करावा लागला. तेव्हा त्याच्या चालक दलातील सदस्यांनी बचावासाठी पाण्यात उडी घेतली. यातील 5 जण वाचले तर एका क्रू मेंबरचा मृतदेह मिळाला. अद्याप 4 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. समुद्रात चेतक हेलिकॉप्टर आणि तीन जहाजे शोध घेत आहेत. 


गोवा तटरक्षक दलाने चेतक हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचवलेल्या 5 सदस्यांना गोवा बांबुळी मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. एक सदस्य मृतावस्थेत आढळला. 3 जहाजे अद्यापही चार बेपत्ता सदस्यांचा शोध घेत असल्याचे तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 


'जोवाड' चक्रीवादळाची तीव्रता कमी, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला दिलासा


जोवाड चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे.  जोवाड पुरी आणि कोणार्कमध्ये आधी धडकणार होते. मात्र चक्रीवादळाने दिशा बदलल्याने तीव्रता कमी झाली आहे. जोवाडमुळे किनारपट्टी भागात मात्र  पावसाचा अंदाज आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून त्याचे रुपांतर डिप डिप्रेशनमध्ये त्याचे रुपांतर झाले आहे. चक्रीवादळ संध्याकाळी 5.30 च्या सुमारास पश्चिम- मध्य बंगालच्या खाडीवरून विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशपासून 180 किमी पूर्व-दक्षिण पूर्व आणि पुरी, ओडिसापासून 330 किमी दक्षिण- दक्षिण- पश्चिम येथे केंद्रित होते. चक्रीवादळ समुद्रातच संपुष्टात येत असल्यानो डिप डिप्रेशनमध्ये रुपांतर झाले आहे. डिप डिप्रेशनमध्ये रुपांतर झाल्याने वाऱ्यांचा वेग कमी झाला असून सध्या 75 किलोमिटर प्रति तासाने वारे वाहत आहे. 


आंध्रप्रदेश, उडीशा, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाममधील भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.  पश्चिमी चक्रीवातामुळे 6 डिसेंबरपासून हिमालय परिसरात जोरदार बर्फवृष्टीची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, लेह-लडाख, काश्मिर आणि उत्तराखंड परिसरात मोठ्या बर्फवृष्टीचा अंदाज आहे.