सांगली :  जम्मू- काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील  वाळवा तालुक्यातील  शिगाव गावचा  23 वर्षीय रोमीत तानाजी चव्हाण शहीद झालाय.  जम्मू- काश्मिरमधील शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत दोन सुरक्षा जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये रोमितचा समावेश आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. शोपियां जिल्ह्यातील जैनापुरातील चेरमार्ग भागात आज दुपारी ही चकमक झाल्याची माहिती मिळत आहे. 


वाळवा तालुक्यातील शिगाव  गावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण (वय 23) यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आले. जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. त्यामध्ये शिगाव गावचे सुपुत्र  राष्ट्रीय रायफलचे जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. पाच वर्षापूर्वी रोमित हा मुंबई येथे सैन्य दलात भरती झाला. त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे महार रेजिमेंटल सेंटरवर त्यांचे एक वर्षे ट्रेंनिग झाले होते. चार महार येथून त्याच्या सेवेला सुरूवात झाली होती. 


एक वर्षा पूर्वी जम्मू काश्मीर येथे 1 राष्ट्रीय रायफलमध्ये पोस्टिंग झाले. जम्मू काश्मीर येथील शोपिया भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला समजताच या भागात घेराबंदी करून सर्च ऑपरेशन  राबवण्यात आले. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला यामध्ये शिगाव येथील रोमित चव्हाण  आणि उत्तर प्रदेश येथील संतोष यादव हे जवान शहीद झाले. 


रोमितचे वडील तानाजी चव्हाण हे राजारामबापू पाटील साखर कारखाना येथे कार्यरत आहेत. आई गृहिणी आहे. तर बहिण शिक्षण घेत आहे. शिगाव गावासह आजूबाजाच्या भागात ही बातमी समजताच सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. गावावर शोककळा पसरली आहे. पार्थिव रविवारी संध्याकाळपर्यंत गावात येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.


संबंधित बातम्या : 


Shopian Encounter : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, दोन जवान शहीद


Jammu And Kashmir: शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा


Aroosa Parvaiz: मी हृदयाने मुस्लिम, हिजाबची गरज नाही; ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांना बारावी टॉपर अरुसा परवेझचं उत्तर