Encounter In Jammu And Kashmir : दक्षिण काश्मीरच्या शोपियानमध्ये आज शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. या परिसरात सुरक्षा दलाकडून अद्याप ऑपरेशन सुरूच आहे. शोपियानच्या झैनापोरा आणि चेरमार्ग भागात सुरक्षा दलाच्या जवान दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत.


दरम्यान,  याबाबत काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, आज सकाळी ही चकमक शोपियानच्या झैनापोरा आणि चेरमार्ग भागात सुरू झाली. यादरम्यान, तेथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाच्या जावानांनी देखील त्यांना चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. दक्षिण काश्मीर हा अतिशय संवेदनशील भाग मानला जातो. अनेकदा येथे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमकीच्या घटना समोर येत असतात. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी सांगितले की, दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) चे होते. 29 जानेवारी रोजी अनंतनागमध्ये हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद गनी यांच्या हत्येमध्ये एका दहशतवाद्याचा हात होता.


 








दरम्यान,11 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्येही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या ताफ्यावर ग्रेनेडने हल्ला केला होता. या हल्ल्यात 5 जवान जखमी झाले होते. तसेच 7 फेब्रुवारीलाही जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत एक दहशतवाद्याचा खात्मा केल्याची घटना घडली होती. मागील काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलिसांनी 11 जणांना अटक करून प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. त्यांच्याकडून शस्त्रं आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह्य साहित्य जप्त करण्यात आली होती. 


महत्त्वाच्या बातम्या: