Marathwada Teacher Constituency Election: प्रत्येक निवडणुकीमध्ये (Election) मताचा टक्का वाढावा मतदान केंद्रापर्यंत (Polling Station) मतदार पोहोचावा यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याच आपण यापूर्वी अनेक वेळा पाहिलं. मात्र याच्या विरुद्ध चित्र सध्या होऊ घातलेल्या मराठवाडा शिक्षक मतदार संघातील मतदारांचे झालेय. कारण मराठवाड्यातील शिक्षक मतदारांना मतदानासाठी या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जावे लागत आहे. त्यामुळे शिक्षक मतदारांच्या खिशाला कात्री तर बसतच आहे, पण होणारा मानसिक त्रास वेगळाच आहे. 


मूळचे लातूरचे असलेले उमाकांत गवळी सर गेल्या अनेक वर्षापासून ते गेवराई तालुक्यातील खळेगाव येथे एका संस्थेवर मुख्याध्यापक म्हणून सेवा देत आहेत. मात्र शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी त्यांना मतदान करण्यासाठी बीड वरून लातूरला जावं लागणार आहे. आता ही परिस्थिती एकट्या गवळी सरांची नसून उस्मानाबादचे कालिदास पांढरे यांना देखील बीडहून मतदान करण्यासाठी उस्मानाबादच्या तेर गावात जावं लागणार आहे. कारण मतदान नोंदणी करताना त्यांनी आधार कार्डवरचा मूळ पत्ता आणि सध्या राहत असलेला पत्ता दिला होता. पण नोंदणी करणाऱ्यांनी मूळ पत्ताच ग्राह्य धरला असून, ज्यामुळे मतदान करण्यासाठी या शिक्षकांना वेगवेगळ्या जिल्ह्यात जावं लागणार आहे.


मूळ गावाचाच पत्ता गृहीत धरले जात आहे. 


आधारकार्ड बनवतांना बहुतांश जणांचा पत्ता मूळ गावाचाच नोंद केलेला असतो. मात्र पुढे व्यवसाय किंवा नोकरी निमित्ताने गाव सोडून अनेकदा इतर ठिकाणी स्थलांतर व्हावे लागते. मात्र या काळात आधार कार्डवर असलेला पत्ता सहसा कोणी बदलत नाही. त्यामुळे शहर किंवा गाव बदलेले असले तरीही आधारवरील पत्ता मात्र तोच कायम असतो. मात्र आता अशात केवळ आधार कार्डचा पत्ता ज्या गावचा आहे. त्या गावचे लोकेशन गृहीत धरून, परत मतदानासाठी त्याच गावात पाठवणे कितपत योग्य आहे,  असा प्रश्न या मतदारांनी उपस्थित केला आहे. 


आहे त्याच ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळावा 


राज्यातील काही खाजगी शिक्षण संस्था सोडल्या तर जिल्हा परिषद अथवा संस्थेतील शिक्षकांच्या सुद्धा कायम बदल्या होत असतात. या शिक्षकांचे कामाचे ठिकाण बदलले तरी आधार कार्डवरचा मूळ पत्ता मात्र तोच राहतो. त्यामुळे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत तरी शिक्षकांना आहे, त्याच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने केली आहे. 


तर अनेक शिक्षकांना एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यामध्ये मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जावे लागणार आहे. या निवडणुकीतील मतदारांचा आकडा जरी फार मोठा नसला, तरी या प्रक्रियेत सहभागी झालेल्या शिक्षकांना मात्र प्रशासनाच्या या कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jaidatta Kshirsagar : जयदत्त क्षीरसागरांचा शेवटच्या क्षणी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा, राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंना धक्का