हिंगोली : एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा घसरत जात असल्याचा आरोप होत असताना, दुसरीकडे मात्र हिंगोली जिल्ह्यातील गढाळामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने शिक्षणाच्या बाबतीत एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.



सध्या सर्व शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. पण गाढळच्या शाळेत मात्र चक्क शाळा सुरु आहे. ही आहे हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात येणारी गढाळाची जिल्हा प्राथमिक शाळा. आपल्याला प्रश्न पडला असेल की, इतर शाळांसारखीच असणाऱ्या या शाळेचे वैशिष्ट्य काय? वर वर पाहता ही शाळा इतर शाळांसारखीच वाटते. प्राथमिक शाळा असल्याने या शाळेत 5 वर्ग आहेत आणि दोन शिक्षक.

 

365 दिवस चालणारी शाळा

 

काही वर्षांपूर्वी ही शाळा इतर शाळांसारखीच होती. मात्र या शाळेत उत्तम वानखेडे आणि सिद्धेश्वर रणखांब हे दोन शिक्षक आल्यापासून या शाळेचे चित्रच बदलले आहे. या शाळेला कधीच सुट्टी नसते, वर्षाच्या 365 दिवस चालणारी ही कदाचित महाराष्ट्रातील एकमेव शाळा असेल. सध्या इतर शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागलेल्या असताना मात्र ही शाळा सुरु असून, या शाळेत अभ्यास घेतला जात आहे.



विशेष म्हणजे दिवसाचे 24 तास शाळा सुरु असून, विद्यार्थ्यांचे पालक बाहेर गावी कामानिमित्त गेल्यावर विद्यार्थ्यांना शाळेत निवासी व्यवस्था शिक्षक आणि गावकऱ्यांतर्फे करण्यात आली आहे.

 

सध्या उन्हाळ्यातही शाळा सुरु असून, पुढील वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आताच घेण्यात येत आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना सराव होईल. छोट्याशा शाळेच्या प्रत्येक गोष्टीचा वापर मुलांना शिक्षणासाठी करण्यात आला आहे. बाहेर वऱ्हांड्याचा वापर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केला जातो.



हायटेक शाळा

 

शाळा जिल्हा परिषदेची असली, तरी पूर्णपणे हायटेक आहे. विद्यार्थांना पुस्तकामधून शिकवलेले विषय चांगल्या प्रकारे समजण्यासाठी त्यांची चित्रफित टीव्हीच्या माध्यमातून दाखवली जाते. शाळेतला लहान विद्यार्थीसुद्धा संगणक अगदी सहजपणे चालवतो. संगणकाच्या माध्यमातून अनेक विषयांचा अभ्यास घेतला जातो.

 

गावकऱ्यांचीही मदत

 

शाळेतील डेस्कचा वापरही गणित लिहून ज्ञान वाढवण्यासाठी केला गेला आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून, वर्गात कुलर बसवले आहेत. कोणत्याही मंदिरात साप्ताह, कीर्तन, आरती होत असते. मात्र गढाळा येथील मारुती मंदिरात या शाळेचे दोन वर्ग भरवले जातात. शाळेला दोनच खोल्या असल्यामुळे जागा अपुरी पडत आहे. गावकऱ्यांनी सप्ताह आणि कीर्तन बंद करून ज्ञानदानाचा या उत्तम कामासाठी मंदिर वापरायला दिले आहे. शिक्षक आणि गावकर्यांच्या प्रयत्नाने ही शाळा आदर्श झाली आहे. नावाजलेल्या शाळांच्या विद्यार्थी नवोदय शाळेची परीक्षा पास होऊ शकत नाही. तिथे या शाळेचे अनेक विद्यार्थ्यांनी  नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला आहे.

 

खेळातील सहभागासाठी प्रोत्साहन

 

शारीरिक क्षमता असूनही अनेक विद्यार्थी योग्य मार्दर्शन आणि प्रोत्साहन अभावी मागे पडतात. या शाळेत फक्त शिक्षणावर भर दिला जात नाही, तर विद्यार्थ्यांच्या शारीरीक विकासाकडेही तितकेच लक्ष दिले जाते. सकाळी 4 वाजल्यापासून शिक्षक विद्यार्थ्यांना मैदानावर घेऊन जातात आणि व्यायाम, प्राणायाम घेण्यात येते. याचे फलित म्हणजे आतापर्यंत या दुर्गम शाळेचे अनेक विद्यार्थी क्रीडा प्रबोधिनी मध्ये लागले आहेत.

 

अवघ्या 350 वस्तीचं असलेल्या या गावात प्राथमिक शाळेत 84 विद्यार्थी असून, यापैकी 32 विद्यार्थी बाहेर गावचे  आहेत. यामध्ये अनेक पालकांनी इंग्रजी शाळा सोडून त्यांच्या पालकांना या शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळेत 365 दिवस विद्यार्थ्यासाठी पोषण आहार शिजवला जातो.

 

इंग्रजी शाळेला मात देणाऱ्या गढाळासारख्या शाळा जात इतरत्र झाल्या, तर इंग्रजी शाळा ओस पडल्या शिवाय राहणार नाही. ही शाळा यशस्वीरित्य करण्यात शिक्षकांचे अथक परिश्रम सोबत गावकऱ्यांची त्यांना लाभलेली साथ आहे.