जळगाव : मेथीची भाजी कच्ची खाल्ल्यामुळे जळगावात एका महिलेला प्राण गमवावे लागले. धरणगावच्या अंजूबाई पाटील यांचा मृत्यू झाला. विषबाधेने मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे.
ज्या शेतातली मेथीची भाजी अंजूबाई यांनी खाल्ली तिथे चार दिवसांपूर्वीच कीटकनाशकाची फवारणी झाली होती, त्याकडे त्यांचं दुर्लक्ष झाल्याचं म्हटलं जात आहे.
खरं तर हा विषय फक्त एका अंजूबाईंपुरता मर्यादित नाही. आपणही कीटकनाशकांच्या धोक्याबद्दल जागरुक आहोत का? आपण घरी फळं, भाज्या खाताना योग्य ती काळजी घेतो का? आपल्या घरात वारंवार लहान मुलं आजारी तर पडत नाहीत? यातले धोके टाळण्यासाठी नेमक काय करायचं? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
आपल्या देशात शेतीत कीटकनाशक वापरण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात साधारण साडेसात हजार टन कीटकनाशकं वापरली जातात. त्यातली अडीच ते तीन हजार टन ही अतिजहाल गटात मोडणारी असतात.
या कीटकनाशकांमुळे लहान मुलं, गर्भवतींच्या आरोग्याला अधिक धोका असतो. कॅन्सर, अस्थमा, मूत्रपिंडासह मानसिक आजार, त्वचाविकाराचा धोका असतो. मज्जातंतू, यकृत, मेंदूवर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. आहारातून अंश पोटात गेल्यास प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. तर रोगप्रतिकार शक्तीवर थेट आघात होतो.
मुंबईसारख्या महानगरात रेल्वेरुळा शेजारच्या जागेत, सांडपाण्यावर पिकवलेल्या, अवाजवी कीटकनाशक फवारलेल्या भाज्या सर्रास आपल्या आहाराचा भाग बनतात. हा प्रकार कुठल्याही स्लो पॉयजनिंग इतकाच भीषण असतो. याचे धोके जितक्या लवकर आपल्या लक्षात येतील तितकं चांगलं. त्यामुळे कच्च्या भाज्या खाताना योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.
मेथीची भाजी कच्ची खाल्ल्याने महिलेचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Dec 2018 05:57 PM (IST)
ज्या शेतातली मेथीची भाजी महिलेने खाल्ली होती, तिथे चार दिवसांपूर्वीच कीटकनाशकाची फवारणी झाली होती. त्यामुळे विषबाधेने तिचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -