धुळे : धुळे महानगरपालिकेचा निवडणूक प्रचाराने शहरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणूक प्रचारासाठी इतरांच्या तुलनेने वेगवेगळे फंडे वापरण्याची चढाओढ सुरु आहे. सध्या एका प्रभागात दोन सदस्य संख्या होती. मात्र आता नवीन प्रभाग रचनेनुसार एका प्रभागात चार सदस्य (नगरसेवक) अशी रचना आहे.


भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांची वेगवेगळी राजकीय खेळी सध्या चर्चेचा विषय आहे. यात वेगळं प्रचार कार्यालय सुरु करणे, उमेदवारांच्या मुलाखती घेणे, आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा करुन नंतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार राजीनामा देणार नसल्याचं जाहीर करणं, स्वतःच महापौरपदाचा उमेदवार असल्याचं जाहीर करणं, नंतर स्वतःच्या पत्नीला महापौरपदाचा उमेदवार जाहीर करणं, असं करत असताना कोरी पाटी असलेलेच उमेदवार आपण देणार असल्याच्या स्वत:च्या वक्तव्याला गोटे यांनी घरातूनच छेद दिला.

महापालिका निवडणूक आपल्याच नेतृत्वाखाली होण्याचा गोटेंचा अट्टहास, मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने निवडणुकीची सोपवलेली जबाबदारी, याबाबतही गोटे यांनी नाराजी व्यक्त केली. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रोहयो, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना टीकेचं लक्ष्य करणं, भाजपात गुंडांना प्रवेश यामुळे आमदार अनिल गोटे यांनी वेगळी चूल मांडली. नंतर लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमातून सर्वच्या सर्व 19 प्रभागातून 74 उमेदवार दिले आहेत. मात्र या उमेदवारांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळालं नाही. प्रत्येकाला वेगवेगळे चिन्ह मिळाल्याने मतदार संभ्रमित झाले आहेत. 'मेरा शहर बदल के ही रहेगा', 'गुंडगिरी मुक्त धुळे शहर' ही आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम या पक्षाची निवडणूक घोषवाक्य आहेत.

दुसरीकडे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे या तीन भाजपच्या मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसतं.

ज्या प्रभागात लोकसंग्रामचे उमेदवार नाहीत, अशा प्रभागातत शिवसेनेच्या पाच उमेदवारांना लोकसंग्राम पक्षाने पाठिंबा दिला आहे. तर ज्या प्रभागात शिवसेनेचे उमेदवार नाहीत अशा 13 वॉर्डमध्ये लोकसंग्रामच्या उमेदवारांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे गुंडगिरीमुक्त धुळे शहरासाठी मनसेनेही लोकसंग्राम पक्षाला पाठिंबा दिला आहे.

या निवडणुकीत शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, सपा, रासप, संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना धुळेकरांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळतं, रस्ते, गटारी, आरोग्य या समस्याही सुटलेल्या नाहीत. राष्ट्रवादीत राहून ज्यांना महापौरपद मिळालं, जे नगरसेवक झाले, अशी मंडळी पक्ष सोडून भाजपात गेल्याने, आता या निवडणूक निकालावर काय परिणाम होतोय हे लवकरच स्पष्ट होईल.

मनसेने आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला पाठिंबा दिला आहे. महापालिकेत विरोधीपक्षाची भूमिका शिवसेना योग्यरित्या पार पडू न शकल्याने, मनपात सत्ताधाऱ्यांचं फावलं असा जनमानसात सूर आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मनपा निवडणूक लढवत आहे. शिवसेनेचे पालकमंत्री असूनही शिवसेना धुळे शहराच्या विकासासाठी मागे का राहिली. या जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर शिवसेनेच्या एकाही नेत्याकडून अद्यापपर्यंत मिळालेलं नाही .

धुळे महापालिका हद्द वाढ झाल्यानंतर प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीत दहा गावातील ग्रामस्थ मतदानाचा हक्क बजावणार आहे. काँग्रेसतर्फे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे निवडणूक प्रचारात सध्या व्यस्त दिसत असल्याने, त्यांची राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

मैदान जवळ आहे, महापालिकेच्या सत्तेची चावी मतदार कोणाच्या हाती सोपवतात हे मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल.