जळगाव : सुरवातीला ग्रीन झोनमध्ये असणारा आणि लवकरच सर्व नियाम शिथिल होण्याची वाट बघणाऱ्या नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा अक्षरशः उद्रेक झालाय. सुरक्षित असणाऱ्या जळगावमधील कोरोना बधितांचा आकडा सोळाशेहून अधिक झला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एक अत्यंत दुर्दैवी घटना जळगावमधून समोर आली. एका वृद्ध महिलेचा मृतदेह चक्क 8 दिवस रुग्णालयातील शौचालयात पडून होता. अशा एक ना अनेक जीवघेण्या घटना जळगावमध्ये घडल्या आहेत.

जळगावमधील रुग्ण संख्या अचानक का वाढली? हा प्रश्न जसा सर्वसामान्य नागरिकांना पडलाय, तसाच सरकारलाही. याच प्रश्नाच उत्तर शोधण्यासाठी एबीपी माझाही जळगावच्या कोविड रुग्णालयात पोहचले. तेव्हा अनेक गंभीर आणि धक्कादायक बाबी उघडकीस आल्यात. कोविड रुग्णाच्या वॉर्डमध्ये रुग्णाचे नातेवाईकच रुग्णांची सेवा आणि देखभाल करत असल्याचं निदर्शनास आलं. रुग्णालयाच्या आवारातच टेस्टिंग लॅब असून रुग्णांचे चाचणी अहवाल 5 ते 6 दिवस येत नाहीत. तर काही रुग्णांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो, पण तरीदेखील त्यांचा कोरोना चाचणी अहवाल हाती येत नाही. रुग्णांच्या रक्तासह विविध टेस्टचे नमुने हे अक्षरशः उघड्यावर नेले जातात. यात ना त्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी, नाही नमुन्या बाबतची खबरदारी. आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा इतर रुग्णांच्या जिवावर उठत असताना एका रुग्णाच्या शरीरात रक्त फक्त दोन टक्के असल्याचा अहवाल सरकारी प्रयोगशाळेने दिला. त्याच रुग्णाच्या शरीरात 13 टक्के रक्त असल्याचा अहवाल एका खाजगी लॅबने दिल्याने रुग्णाला खाजगी रुग्णालायत दाखल करण्यात आलं. त्यानंतर तो ठणठणीत बर देखील झाला.

जळगावमध्ये सर्वाधिक रुग्ण जून महिन्यात वाढले. 2 एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आला आणि सव्वादोन ते अडीच महिन्यात हा आकडा थेट 1600 वर जाऊन पोहचला. जळगाव जिल्ह्यात एप्रिल महिन्यात 30 एप्रिल पर्यंत कोरोना बधितांची संख्या 31 होती, 10 जणांचा मृत्यू झाला होता. तर, एका रुग्णाने कोरोनावर मात केली होती. 31 मे पर्यंत 738 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील 81 रुग्णांचा मृत्यू तर 258 कोरोनामुक्त झाले, मात्र इथून पुढे हा आलेख चढाच राहिला असून तो अद्यापही नियंत्रणात नाही. त्यामुळेच जळगावच्या आरोग्य यंत्रणेची लक्तरे अक्षरशः वेशीला टांगली गेलीय.

जळगावात कोरोना बधितांचा आकडा जूनच्या पहिल्या 10 दिवसांत पावणे आठशेवर जाऊन पोहचला, मृतांची संख्या ही 48 ने वाढली, आजमितीस 856 रुग्णांनी या महामारीवर मात केलीय एवढीच काय ती समाधानाची बाब!

आतापर्यंत (15 जुन 2020) जळगावमध्ये 1811 जणांना कोरोनाची लागण झालीय तर 143 मृत्यू झालेत, रोज 100 च्या संख्येने रुग्ण वाढत असताना देखील आरोग्य यंत्रणेकडून हलगर्जीपणा सुरु आहे, 2 जून पासून बेपत्ता असणाऱ्या महिलेचा मृतदेह दुर्गनधी आल्यानंतर आढळून येतो, ही कुठल्याही यंत्रणेसाठी शरमेची बाब आहे. झाल्या प्रकारनंतर तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, अधिकारी बदलेले, पण कार्यपद्धती तीच. नव्याने पदभार घेणाऱ्यांकडे आपल्याकडे किती स्टाफ याचीही माहिती नाही. जळगावच्या रुग्णालयात स्टाफची कमतरता आहे. त्यात काही डॉक्टर्स, कर्मचारी कर्तव्य बजावत नाही. तर जे काम करत आहेत, त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे, 7 दिवस सेवा बजावल्यानंतरही डॉक्टर्सला नियमाप्रमाणे क्वॉरंटाइन केलं जात नसल्याचं गंभीर वास्तव ही समोर आलं आहे.

प्रशासनाकडून सुरवातीलाच काही अंशी दुर्लक्ष झालं, लॉकडाऊन कालावधी व्यवस्थित पार पडला नाही, नागरिकांच्या गर्दीवर पोलिसांचे नियंत्रण नाही. जिल्हाप्रशासन आरोग्य यंत्रणेमध्ये नियोजन नसल्यानं सर्वत्र सावळा गोंधळ बघायला मिळत असून रुग्णांची संख्या तर झपाट्यानं वाढत आहे. शिवाय मृत्युदर ही देशात सर्वाधिक आहे. जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, एकनाथ खडसे यांच्यासारखे मुरब्बी राजकारणी असतानाही जळगावची जनता स्वतःला पोरकी समजत असून आपल्याला कोणी वाली नाही का? असा सवाल उपस्थित करत आहे. एकूणच परिस्थिती हाताबाहेर जात असली तरी यातून बाहेर पडता येवू शकतं केवळ अधिकाऱ्यांचे निलंबन आणि नव्यांची भरती करून उपयोग नाही तर योग्य नियोजन आणि त्यांच्यात संवाद असणे गरजेचे आहे.

जून महिन्यातील जळगावमधील रुग्णांच्या आकडेवारीचा चढता आलेख :

1 जून : कोरोना बाधित 762, मृत्यू 94, कोरोनामुक्त 316

2 जून : कोरोना बाधित 800, मृत्यू 102, कोरोनामुक्त 354

3 जून : कोरोना बाधित 871, मृत्यू 107, कोरोनामुक्त 370

4 जून : कोरोना बाधित 907, मृत्यू 113, कोरोनामुक्त 429

5 जून : कोरोना बाधित 957, मृत्यू 115, कोरोनामुक्त 448

6 जून : कोरोना बाधित 1001, मृत्यू 117, कोरोनामुक्त 478

7 जून : कोरोना बाधित 1084, मृत्यू 117, कोरोनामुक्त 478

8 जून : कोरोना बाधित 1165, मृत्यू122, कोरोनामुक्त 530

9 जून : कोरोना बाधित 1281, मृत्यू 129, कोरोनामुक्त 567

10 जून : कोरोना बाधित 1395, मृत्यू 116, कोरोनामुक्त 597

11 जून : कोरोना बाधित 1526, मृत्यू 120, कोरोनामुक्त 601

12 जून : कोरोना बाधित 1578, मृत्यू 133, कोरोनामुक्त 656

13 जून : कोरोना बाधित 1653, मृत्यू 136, कोरोनामुक्त 724

14 जून : कोरोना बाधित 1720, मृत्यू 141, कोरोनामुक्त 770

15 जून : कोरोना बाधित 1811, मृत्यू 143, कोरोनामुक्त 856

महत्त्वाच्या बातम्या : 

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अकोला, जळगाव जिल्हा दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

जळगाव कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार; कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा रुग्णालयाबाहेर वावर