नांदेड : जून 2016 साली अमिताभ बच्चन याना पद्म पुरस्काराने तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. याच कार्यक्रमात आसामच्या जोरहाट येथील जादव पायेंग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. पायेंग यांनी आसामच्या जोरहाट या ठिकाणी 1250 एकर जमिनीवर झाडे जंगल निर्माण केले. त्यामुळे पायेंग यांना राष्ट्रातर्फे गौरवण्यात आले होते. आता अगदी असाच काहीसा उपक्रम नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात सुरू झाला आहे.


कंधार हे राष्ट्रकूटकालीन गाव नांदेड शहर मुख्यालयापासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर आहे. डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी बसलेल्या या गावात राष्ट्रकुटांच्या काळात पाण्याच्या योजना झाल्या. त्या अजूनही जिवंत आहेत. राष्ट्रकुटांच्या काळात कंधार हे राजधानीच शहर होतं. पण अलीकडच्या काळात या तालुक्याला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागतोय. या मातीत अनेक प्रकारची माणसे अनेक क्षेत्रात नावारूपास आली. सध्या इथल्या मातीचे श्याम मामडे हे ऋण फेडण्याचा प्रयत्न करत आहेत. मामडे परिवार हा पिढ्यानपिढ्यांपासून कंधारात स्थायिक आहे. सध्या या परिवारात शिवा मामडे यांचे आई वडील तीन भावंड त्यांच्या पत्नी मुलबाळ आनंदाने नांदत आहेत. 25 वर्षांपूर्वी शिवा मामडे यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. आता मात्र मामडे कुटुंब अत्यंत सुखात आहे.


आपल्याला याच कंधारच्या मातीने घडवलं जगवलं आर्थिकदृष्ट्या संपन्न केलं ही भावना शिवा मामडे यांच्या मनात आहे. त्यातूनच आपण या कंधारसाठी काहीतरी केले पाहिजे हा विचार शिवा मामडे त्यांच्या मनात आला. परिवाराशी चर्चा केल्यावर वृक्षारोपण करुया असे ठरले. मग काय शिवा मामडे यांनी धडाक्यात सुरुवात केली. शासनाने देखील शंभर कोटी वृक्ष लागवड योजना केली. त्यातील किती झाडे जगली हा संशोधनाचा विषय आहे. आपल्या वृक्षारोपणाचा फज्जा उडू नये ही काळजी शिवा यांनी घेतली. 2017 साली कंधार शहरातील अनेक भागात त्यांनी 500 झाडे लावली. महत्वाचं म्हणजे ती झाडे जगवली. झाडे लावणे त्याला खत घालणे, त्याच्याभोवती कुंपण टाकणे, त्यांना वेळोवेळी पाणी देणे ही कामे शिवा यांनी केली. पोटच्या मुलांसारखे त्यांनी या झाडांचे संगोपन केले. त्यामुळे आता त्याची फळॆ कंधारवासियांना मिळणार आहेत.


कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अन् विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसानं झोडपलं


ही झाडे शिवा यांनी देशाच्या विविध भागातून मागवली. आंब्याच्या विविध जाती, चिकू, जांभूळ, अशी झाडे लावली. या झाडांच्या रोपांची खरेदी 75 रुपये ते 150 रुपयांपर्यंत केली. उत्तरप्रदेशातील लखनौ, आंध्र प्रदेशातील राजमंद्री अशा ठिकाणांहून ही झाडे मागवली. आता लावलेली ही झाडे तीन वर्षांची झाली आहेत. 2017 साली 500 झाडे लावली. आज 2020 साली 500 झाडे जिवंत आहेत. या झाडांभोवती ज्या संरक्षक जाळ्या बसवल्या आहेत त्यावर नंबर्स टाकण्यात आले आहेत. या नंबर्समुळे त्या झाडांची वर्तमान स्थिती शिवा यांना सहज कळते.


आता नुकतीच शिवा यांनी योजना जाहीर केली आहे. एक झाड लावा एक हजार रुपये बक्षीस मिळवा अशी ही योजना आहे. यासाठी त्यांनी हरित कंधार नावाचे मोबाईल अॅप सुद्धा तयार करून घेतले आहे. त्यासाठी 50 हजार रुपये खर्च केले आहेत. ज्या व्यक्तीला या योजनेत सहभागी व्हायचे आहे, त्याने या अॅपवर जाऊन काही माहिती भरायची आहे. त्यानंतर शिवा मामडे यांना भेटून रोप आणि खत मोफत घेऊन जायचे आहे. ज्या ठिकाणी हे झाड लावले त्याचा अक्षांश रेखांश या अॅपमध्ये रेकॉर्ड केला जातो. झाडाचे संगोपन करुन प्रत्येक आठवड्याला त्याचा या अॅपमध्ये फोटो काढायचा आहे. हे झाड तीन वर्षे जगवल्यावर त्या व्यक्तीला एक हजार रुपये शिवा मामडे हे बक्षीस देणार आहेत. महत्वाचे म्हणजे ही झाडे तुम्ही तुमच्या घरासमोर परिसरात कुठेही लावू शकता.


मामडे यांचे कंधारमध्ये सोन्याचांदीचे दुकान आहे. कुटुंबाचा गाडा अत्यंत व्यवस्थित चालतो. वर्षाकाठी मिळणाऱ्या उत्पनातून काही हिस्सा ते या वृक्षलागवडीवर खर्च करतात. तसा त्यांचा संकल्पच आहे. आजवर त्यांनी या उपक्रमावर साधारण 10 लाख रुपये स्वतःच्या उत्पन्नातून खर्च केले आहेत. वृक्षारोपणाच्या उपक्रमासाठी ते कुणाकडूनही आर्थिक किंवा अन्य मदत घेत नाहीत. बक्षिसासाठीची रक्कमही ते स्वतःच्या खिशातून खर्च करणार आहेत.


शिवा मामडे यांनी 2017 साली फक्त 500 झाडेच लावली. वाचताना हा आकडा कदाचित छोटा वाटेलही पण 2017 ते 2020 या काळात त्यांनी या झाडांचे संपूर्ण संगोपन केले आणि फलश्रुतित आता ही झाडे मोठी झाली आहेत. आता झाडे लावण्याची आणि जगवण्याची गती वाढवण्यासाठी त्यांनी झाडे लावा बक्षीस मिळवा ही योजना सुरू केली आहे. खरंतर शासन देखील वृक्ष लागवडीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. पण एवढी वर्षे कोट्यवधी रुपये खर्चूनही महाराष्ट्रातील जंगल 21 टक्क्यांच्या सातत्याने खालीच येतंय. त्यामुळेच सामाजिक वनीकरण विभागाने शिवा मामडे यांचा पॅटर्न महाराष्ट्रभर राबवला तर हरित महाराष्ट्र होऊन निसर्गाची माया प्रेम मिळणे सहज शक्य आहे.


Rural News | संगमेश्वरमध्ये आरवली नदीपात्रात रसायन सोडल्याने पाणी दूषित | माझं गाव माझा जिल्हा