Jairam Ramesh : निवडणूक आयोग या निष्पक्ष असलेल्या संस्थेवरील आमचा विश्वास उडत आहे, हा आमचा लोकशाहीसाठी धोका असल्याचे मत काँग्रेस नेते जयराम रामेश यांनी व्यक्त केले. इंडिया आघाडीमधील पक्षांना निवडणूक आयोगाने गेल्या दहा महिन्यांपासून भेट का नाकारली? आज हा अजून आमच्या समोर प्रश्न असल्याची प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी बोलताना दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईच्या वेशीवर पोहोचली असून या यात्रेचा समारोप उद्या (16 मार्च) मुंबईमध्ये होणार आहे. जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रेचा आज 62 वा दिवस असून उद्या भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस असेल. उद्या याच दिवशी लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांनी आपलं मत व्यक्त केले. ते म्हणाले की, भारत जोडो यात्रा ही आमच्यासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी बूस्टर डोस होता. 


ईडी, सीबीआयच्या माध्यमातून धमक्या देत वसुली


निवडणूक रोखांवरून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत जयराम रमेश यांनी केलं. ज्या कंपन्यांना सरकारने ठेका दिला त्यांच्याकडून सरकारला निधी देण्यात आला असून सरकारची हप्ता वसूली असल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला. एक ते दोन दिवसांमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारी ईडी, सीबीआयच्या माध्यमातून लोकांना धमक्या देत त्यांच्याकडून वसुली करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 


काँग्रेसच्या खात्यावर आलेल्या बंधनांवरून जयराम रमेश यांनी भाजपवर टीका केली. भाजपकडून काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्याचे म्हणाले. काँग्रेसचे स्वतःचे बँक खाते ऑपरेट करू शकत नाही, काँग्रेसला जाणून बसून आर्थिक स्वरूपात अपंग करण्यात येत आहे. मात्र, याला आम्ही घाबरून जाणार नाही, या विरोधात पुढे सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे ते म्हणाले. 


भारत जोडो न्याय यात्रा भिवंडीत 


दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरमधून निघाली असून तब्बल सहा हजार दोनशे किलोमीटरचा प्रवास करत भिवंडीत दाखल होणार आहे. यामुळे भिवंडीत शहरात सर्वत्र बॅनर व झेंडे लावून सजावट करण्यात आली आहे. भिवंडीत राहुल गांधी यांची नदी नाका या परिसरातून रोडशो होणार असून जकात नाका परिसरात राहुल गांधी जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर पुढे हा रोडसो सोनाळे मैदानात जाणारा असून त्या ठिकाणी राहुल गांधी मुक्काम करणार आहेत. 


भिवंडी शहर व ग्रामीण भागातील विविध मुद्द्यांवर पदाधिकारी व कार्यकर्ते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामध्ये टोरंट पॉवर तसेच यंत्रमाग कारखाने, वाहतूक कोंडी ,रस्ते, अशा विविध मुद्द्यांवर राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या यात्रेमध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज आहे भिवंडी शहर व ग्रामीण भागातून तब्बल 1500 पोलीस पदाधिकारी व कर्मचारी तैनात असून शहरात येणारे प्रमुख रस्ते जड व अवजड वाहनांसाठी बंदी घातली असून त्यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही , या यात्रेसाठी पोलीस प्रशासनासह संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या