मुंबई : अनेक कायदे केले तरी जात पंचायतीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशीच एक धक्कदायक घटना अकोला जिल्ह्यात घडल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये पीडित महिलेला जात पंचायतीने पंचांची थुंकी चाटायची शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रश्नावर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक पत्र लिहून कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे. 


काय आहे प्रकरण? 
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील वडगाव या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेने साईनाथ नागो बाबर याच्याशी 2011 साली विवाह केला होता. पतीच्या जाचाला कंटाळून तिने सन 2015 मध्ये न्यायालयातून रितसर घटस्फोट घेतला. पीडित महिलेने न्यायालयात जाणे तिच्या नाथजोगी जात पंचायतच्या पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फोट धुडकावून लावला. दरम्यान पिंडीत महिलेने 2019 मध्ये अनिल जगन बोडखे या घटस्फोटीत व्यक्तीशी पुनर्विवाह केला. असा पुनर्विवाह पंचांनी अमान्य केला व जात पंचायतने तिला एक लाख रुपयांचा दंड केला. 


महाराष्ट्रातील पंचांनी एकत्र येऊन न्यायनिवाडा करत दारु, मटणावर ताव मारला आणि त्या परिवारास जात बहिष्कृत केले. पीडित महिलेने पहिल्या नवऱ्यासोबत रहावे, असा पंचांनी हेका कायम ठेवला. तसेच पंचांनी केळीच्या पानावर थुंकायचे व त्या महिलेने ते चाटायचे अशी शिक्षा पीडित महिलेला देऊन विकृतीचे दर्शन घडविले. 


डॉ. निलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र
या प्रकरणी आता विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे आणि या प्रकरणी कडक कारवाई करावी अशी विनंती केली आहे. अशा घटनां सातत्याने घडत असल्याने कठोरपणे कार्यवाही आणि जातपंचायत कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी ठोस पावले उचलने आवश्यक आहे. तसेच जात पंचायतीचे बरेच प्रलंबित प्रश्न आहेत. घटना घडल्यानंतर प्रथमतः तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब होतो आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे माहिती मिळताच पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल करण्याकरिता प्रयत्न करावा अशी मागणी डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली आहे.


घटना नोंद झाल्यानंतर तक्रार नागरी हक्क संरक्षण कक्षाकडे ताबडतोब देऊन पुढील कार्यवाही जलद गतीने होण्यासाठी वेळेचे निर्बंध घालून देण्यात यावे. जात पंचायतीच्या केसेचा आढावा PCR नागरी हक्क संरक्षण पोलीस महानिरीक्षक यांनी दर पंधरा दिवसाला घेतला तर अशा घटना आटोक्यात आणण्यासाठी नक्कीच फायदा होईल. पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सर्व जात पंचायतीच्या पंचांची माहिती गोळा कडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात यावी असंही डॉ. निलम गोऱ्हे यांनी या पत्रात म्हटलं आहे. 


महत्वाच्या बातम्या :