नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 मे रोजी कोरोनामुळे प्रभावित दहा राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचीत करणार आहेत. मोदी महाराष्ट्रासह दहा राज्यातल्या 54 जिल्हाधिकार्‍यांसोबत स्थितीचा आढावा घेणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वगळून पंतप्रधान थेट जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विविध राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. यामध्ये 20 मे रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होणार असल्याचं सांगिलं आहे. कोरोना संसर्गाने प्रभावित असलेल्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, ओदिशा आणि पुद्दुचेरीमधील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदी बातचीत करणार आहेत.


ममता बॅनर्जींचा आक्षेप
कोरोना स्थितीबाबत बोलावलेल्या बैठकीवरुन विरोध होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वगळून थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी याबाबच पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची शक्यता आहे. सोबतच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही या मुद्द्यावर एकत्रित करतील, असं म्हटलं जात आहे. कारण या बैठकीसाठी "पीएम टू डीएम मायनस सीएम" या पद्धतीचा अवलंब केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक का घेतली जात नाही, यावर प्रश्न उपस्थित केला जाणार आहे.