नाशिक : नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात आयकर विभागाचं छापासत्र सुरु आहे. या तिन्ही जिल्ह्यात टाकलेल्या छाप्यात 180 कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळली आहे. डॉक्टर, पॅथॉलॉजी लॅबवरही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून ही कारवाई सुरु आहे.


गेल्या आठवड्यात या कारवाईला सुरुवात झाली आहे. यामध्ये 20 ते 30 डॉक्टरांच्या सुमारे 50 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले. कट प्रॅक्टिसचा गोरखधंदा या मूळ संशयातून ही कारवाई करण्यात आली. केवळ डॉक्टरांच्याच नाहीतर नाशिक जिल्ह्यातील कृषी प्रक्रिया उद्योगावरही छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे.

कारवाईत बेहिशोबी रोख रक्कम, दागिने, कागदपत्रे, आणि मिळकती मिळाल्या आहेत. त्यांची छाननी सुरु आहे. जवळपास 180 कोटींची बेहिशेबी मालमत्तेवर कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. अनेक ठिकाणच्या नोंदीही संशयास्पद आहेत. छाप्यानंतर अनेकांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात येणार आहे.