पुणे : पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला पावसानं सलग दुसऱ्या दिवशी झोडपलं आहे. पुण्यात मुसळधार पाऊस झाल्यानं त्याचा वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता. तर, पिंपरी चिंचवडमध्ये काही वाहनं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. तर दिवे घाटात ढगफुटी झाल्यानं रस्त्यावरुन पाणी वाहू लागलं होतं. याचे व्हिडिओ समोर आले आहेत.  

आय बी गेस्ट हाऊसमध्ये पाणी साठलं

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका शासकीय इमारतींना सुद्धा बसला आहे. संध्याकाळी झालेल्या पावसामुळे पुणे शहरातील आय बी गेस्ट हाऊस मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. गेस्ट हाऊस मध्ये आमदार, माजी आमदार सरकारी अधिकारी वास्तव्य व्यवस्था प्रभावित झाली. आज झालेल्या पावसामुळे या गेस्ट हाऊस मध्ये असलेल्या जिन्यापर्यंत पाणी साठले होते. येथील कर्मचाऱ्यांनी पाणी जाण्यासाठी जागा केली इतकचं नाही तर स्वतः कर्मचारी बादली आणून पाणी काढण्याचे प्रयत्न करत होते.

पुण्यात मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर पाऊस झाल्यानंतरच पाणी साचलं होतं. पुणे शहरात जवळपास एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. 

दिवे घाटात ढगफुटी

पुण्यातील डोंगर माथ्यावर मुसळधार पाऊस झाला आहे. पुण्यातील दिवे घाट या ठिकाणी मुसळधार पावसानंतर रस्त्याला  ओढ्या नाल्यांचा स्वरूप आलं आहे.. या पाण्यामुळे या ठिकाणी दगड आणि माती देखील वाहून रस्त्यावर आली आहे...

पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची बॅटिंग 

पिंपरी चिंचवडमध्ये 6:30 ते 7:15 असा पाऊस कोसळला, त्यानंतर 9 ते 9;30 असा पाऊस बरसला. आता पावसाने विश्रांती घेतली आहे.पिंपरी चिंचवडमधील ओढ्यात चार ते पाच वाहनं वाहून गेली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. संध्याकाळपासून टप्याटप्याने तुफान पाऊस पडतोय, परिणामी चऱ्होलीतील ओढा ओसंडून वाहू लागला. यात रस्त्यावरील चार ते पाच वाहनं वाहत आली. अग्निशमन दलाने क्रेनच्या साह्याने ही वाहनं बाहेर काढण्यात आलीत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पाऊस थांबताच पाणी ओसरलं

पिंपरी चिंचवड शहरात काल रात्री आलेल्या दमदार पावसामुळे खंडोबामाळ ते थरमॅक्स चौक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाच पाणी तुंबल होत. रस्त्यावर पाणी तुंबलेल्या पाण्यामुळे रस्त्याला जून नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यातून नागरिकांना आपल्या वाहनांनी प्रवास करण्याची वेळ ओढवली होती. एकीकडे पिंपरी चिंचवड महापालिका शहरातील नाले सफाई पावसाळ्यापूर्वीपूर्णपणे करण्यात आल्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांना नद्यांच स्वरूप आलेले चित्र पाहायला मिळत असल्याने महापालिकेने केलेल्या नालेसफाईच पितळ उघडं पडल आहे. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यानं पाणी ओसरू लागले आहे.