मुंबई : पहिल्या महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील 170 पोलीस साहित्यिकांचे साहित्य लेख, पुस्तकं, काव्यसंग्रह या साहित्य संमेलनात मांडले आहेत. सकाळी पोलीस साहित्य संमेलनाची ग्रंथ दिंडी निघाली. या दिंडी मध्ये राज्यभरातील पोलीस पारंपरिक पोशाखात सामील झालेले पाहायला मिळाले. साहित्य संमेलनाला महाराष्ट्र पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, पद्मश्री मधू मंगेश कर्णिक उपस्थित राहणार आहेत. सम्मेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

पोलिसांकडून भरविले जाणारे हे देशातील पहिलेच साहित्य संमेलन असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक दिवस चालणाऱ्या या संमेलनात 170 पोलीस साहित्यिक सहभागी होतील. त्यामध्ये कॉन्स्टेबलपासून ते अप्पर महासंचालक दर्जापर्यतचे अधिकारी आपले साहित्य, विचार मांडणार आहेत.

कामाच्या व्यापामुळे नित्यपणे ताणतणावाला सामोरे जावे लागते. त्यांच्यातील साहित्याविषयाच्या जाणीवा समाजासमोर मांडल्या पाहिजेत, या हेतूने राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी पोलिसांचे साहित्य संमलेन घ्यावे, अशी कल्पना मांडली.  महासंचालक पडलसगीकर यांनी त्याला तात्काळ मान्यता देत सर्व कार्यक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.

पोलिसांमध्येही साहित्यिक, कवी, लेखक लपलेला असतो. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोवीस तास दक्ष असणाऱ्या पोलिसांमधील हे साहित्य गुण समाजासमोर यावेत, यासाठी हे संमेलन होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच ‘दक्ष’ महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलन होत आहे. पोलिसांमधील साहित्यिकाला दाद देण्यासाठी त्यांच्या गुणांना वाखाणण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी केले आहे.