पंढरपूर : इस्कॉन संस्थेने चंद्रभागेच्या पैलतीरावर भाविकांच्या स्नानासाठी 15 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या घाटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणारे लोकार्पण अडचणीत आले आहे. इस्कॉनकडून या घाटाची उभारणी करताना योग्य परवानग्या घेतल्या नसल्याचा आक्षेप जिल्हा प्रशासनाने घेतल्याने आता हे लोकार्पण होणार का? हा प्रश्न उभा राहिला आहे.
महाराष्ट्र शासनाने या संस्थेला 200 मीटरची जागा घाट बांधण्यासाठी दिली होती. या जागेवर इस्कॉनकडून जगभरातील देणगीदारांच्या मदतीने 15 कोटी रुपये खर्चून येथे 150 मीटर लांबीचा घाट चंद्रभागेच्या पैलतीरावर उभारला आहे.
काही दिवसांपूर्वी याच ठिकाणाहून उद्धव ठाकरे यांनी चंद्रभागेच्या महाआरती केली होती. आता या घाटाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केल्याचे संस्थेचे प्रवक्ते डॉ शामसुंदर शर्मा यांनी सांगितले आहे. या घाटावर चंद्रभागा मातेचे मंदिर देखील उभारण्याचे काम सुरु असून रोज सायंकाळी याठिकाणी कशी प्रमाणे चंद्रभागेच्या आरती करण्याचे नियोजन इस्कॉनकडून करण्यात आले आहे.
या सोहळ्याच्या उद्घाटनासाठी जगभरातून इस्कॉनचे सात हजार भक्त पंढरपूर येथे येणार असून या कार्यक्रमासाठी इस्कॉनकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने या घाट बांधणीत कायदेशीर पूर्तता झाली नसल्याने या लोकार्पण सोहळ्याबाबत सर्व अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवला आहे.
आषाढी दशमी अर्थात 11 जुलै रोजी होऊ घातलेल्या या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी झाली असताना प्रशासनाच्या भूमिकेमुळे इस्कॉनच्या अडचणीत वाढ झाली आहे. आम्ही अहवाल सरकारला दिला असून आता पुढचा निर्णय शासनाला घ्यायचा आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.
पंढरपुरातील 15 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या घाटाचे लोकार्पण अडचणीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jul 2019 01:20 PM (IST)
महाराष्ट्र शासनाने या संस्थेला 200 मीटरची जागा घाट बांधण्यासाठी दिली होती. या जागेवर इस्कॉनकडून जगभरातील देणगीदारांच्या मदतीने 15 कोटी रुपये खर्चून येथे 150 मीटर लांबीचा घाट चंद्रभागेच्या पैलतीरावर उभारला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -