मुंबई: एखाद्याच्या मनात जिद्द असेल तर तो काहीही करून यशस्वी होतो, कितीही अडचणी आल्या तरी मागे हटत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा (IPS Manoj Kumar Sharma) होय. मूळचे मध्य प्रदेशमधील असलेले मनोज कुमार शर्मा यांनी एकेकाळी शिपायाचं काम केलं, हमालीही केली, श्रीमंतांची कुत्री फिरवायला नेली आणि मिळालेल्या पैशातून आपल्या स्वप्नांना वाट करून दिली. बारावी नापास झाले तरीही जिद्द सोडली नाही, यूपीएससीच्या (UPSC Success Story) शेवटच्या प्रयत्नात यशस्वी होऊन मनोज कुमार शर्मा आयपीएस झाले. मनोज कुमार शर्मा आणि त्यांच्या पत्नी IRS श्रद्धा जोशी शर्मा (Shraddha Joshi Sharma) या एबीपी माझाच्या माझा कट्टा (Majha Katta) या कार्यक्रमामध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या जीवनाच्या संघर्ष सांगितला.
'ट्वेल्थ फेल' (12th Fail) हा हिंदी चित्रपट मनोज कुमार शर्मा (IPS Manoj Kumar Sharma) आणि त्यांच्या पत्नी श्रद्धा जोशी शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यानिमित्ताने या सनदी अधिकारी जोडीने एबीपी माझाच्या प्रेक्षकांशी संवाद साधला.
बारावी नापास झाले
यूपीएससी परीक्षा पास झालेले अधिकारी हे जन्मताच हुशार असतात असा आपल्याकडे एक समज असतो. पण मनोज कुमार शर्मा हे 12 वी नापास आहेत. त्यांनी त्याबद्दलचा किस्सा शेअर करताना सांगितलं की, शाळेमध्ये कॉपी करण्याची सवय होती, चांगले मार्क्स पाहिजे असतील तर त्यासाठी कॉपी करावी लागत असे. पण एक इमानदार अधिकारी आला आणि त्याने ते बंद केलं. त्यामुळे त्या वर्षी शाळेतील 70 ते 80 टक्के मुलं नापास झाली. त्यावेळी मी देखील नापास झालो. पण त्या अधिकाऱ्याकडे पाहून मी शिकलो, मीही तसं इमानदार व्हायचं ठरवलं.
शिपायाचं काम केलं आणि भरपूर वाचायला शिकलो
ग्वाल्हेरला गेल्यानंतर मनोज कुमार शर्मा यांनी एका लायब्ररीमध्ये शिपायाचं काम केलं. रात्री ती लायब्ररी बंद करताना मनोज कुमार शर्मा हे आतून कडी लावायचे आणि लायब्ररीमधील माईक बंद करून त्यावर बोलायची प्रॅक्टिस करायचे. या ठिकाणी काम करताना शर्मा यांनी अनेक पुस्तकं वाचली, अनेक महापुरूषांचे चरित्र वाचन केलं आणि त्यामुळे आपण घडलो असल्याचं त्यांनी सांगितलं.
श्रीमंतांची कुत्री फिरवण्याचं काम केलं
पुढे दिल्लीला जाऊन यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. त्यावेळी राहण्याचा, खाण्याचा आणि पुस्तकांचा खर्च काढण्यासाठी काही ना काही काम करणं त्यांना भाग होतं. त्याबद्दल आठवण सांगताना मनोज कुमार शर्मा म्हणाले की, दिल्लीत रुमचे भाडे द्यावं लागत असे, पुस्तकांसाठी पैसे द्यावे लागत असे. अशा वेळी प्रत्येक घरी जायचो, बेल दाबायचो आणि तुमच्या मुलांचे ट्यूशन घ्यायचे आहे असं सांगायचो. पण त्यासाठी गॅरंटर पाहिजे असायचा, तो माझ्याकडे नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे ट्यूशनसाठी इंग्रजी किंवा गणित या विषयांना मागणी होती, ती माझ्याकडे नव्हती. त्यामुळे मला ते जमलं नाही.
मनोज कुमार शर्मा पुढे म्हणाले की, त्यानंतर एक काम मिळालं. दिवसभर मी अभ्यास करायचो आणि रात्रीच्या वेळी लोकांच्या कुत्र्यांना फिरवायचो. ज्या घरातील मुलं शिकण्यासाठी बाहेर असायची त्यांच्या घरातील कुत्र्यांना मी फिरवायचो. त्यानंतर त्यांना पुन्हा घरी सोडायचे. एका कुत्र्यामागे त्यावेळी 400 रुपये मिळायचे. त्यावेळी माझ्या दोन हातांमध्ये चार कुत्री असायची.
श्रद्धानेही साथ दिली
मनोज कुमार शर्मा म्हणाले की, कुत्र्यांना फिरवण्याचं काम मी गुपचूप करायचो. मला एकच भीती होती की श्रद्धाला हे जर माहिती पडलं तर ती काय म्हणेल? एक दिवस श्रद्धाने मला कुत्री फिरवण्याचं काम करताना पाहिलं. त्यावेळी मी फारच घाबरलो. माझ्यासाठी प्रयत्न करणारा मुलगा काय काम करतोय असा ती विचार करेल असं मला वाटलं. पण श्रद्धाने त्याला चांगला प्रतिसाद दिला.
नंतर श्रद्धाने आपल्याला साथ दिली आणि मग सर्व काही सोडून, झोकून देऊन अभ्यास केल्याचं मनोज कुमार शर्मा यांनी सांगितलं. त्यानंतर शेवटच्या प्रयत्नात आयपीएस झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणतात की, यूपीएससी असो वा आणखी कोणतीही परीक्षा, आयुष्यातील दोन ते तीन वर्षे दिली, प्रामाणिक प्रयत्न केले तर यश हे नक्की मिळतं. त्यासाठी तुम्ही फक्त प्रयत्न करण्याचं गरज आहे.
ही बातमी वाचा :