नांदेड : एक नवा आदर्श महाराष्ट्रात (Maharashtra) प्रथमच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने निर्माण केला आहे. “आम्हीही माणसं आहोत, आमचेही तसेच रक्त आहे, आम्हीही कुणाचे भाऊ-बहिण आहोत” अशी तृतीयपंथीयांची आर्त हाक ऐकुण नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आता त्यांना त्यांच्या हक्काच्या स्मशानभुमी व तृतीयपंथीय भवनासाठी जागा वितरणाचे आदेश निर्गमीत केले आहे. मागील अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन दिवाळीच्या पर्वावर हा नवा सामाजिक न्यायाची अपूर्व भेट मिळाल्याबद्दल संपूर्ण तृतीयपंथीयांच्या संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले.
नांदेड येथील तृतीयपंथीयांनी सामाजिक न्याय विभागाकडे स्वताच्या हक्काची स्मशानभुमी व किन्नर भवन यासाठी जागा मिळावी अशी मागणी मागील काही वर्षांपासून लावून धरली होती. या मागणीचा प्राधान्याने विचार करून त्यांनाही मानवतेच्या प्रवाहात सामावून घेण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाने ही मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, ही मागणी लक्षात आता तृतीयपंथीयांसाठी हक्काच्या स्मशानभुमी व तृतीयपंथीय भवनासाठी जागा वितरणाचे आदेश दिले आहे.
जमिनीचा आगाऊ ताबा मिळाला...
तृतीयपंथीयांना नांदेड शहरालगत मौ. म्हाळजा परिसरात 1.45 हे. आर. जमीनीबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले. शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार नांदेड तहसिलदार यांना निर्देश देऊन या जमिनीचा आगाऊ ताबा सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांना देण्याचे आदेशीत केले आहे. ही जमीन अतिक्रमण मुक्त, निर्विवाद आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांची दिवाळी गोड झाली आहे.
तृतीयपंथीयांच्या हक्काच्या जमीन वाटपात सर्वच घटकांच्या संवेदनेचा गौरव
प्रशासकीय पातळीवर अनेक संवेदनशील प्रश्नांना हाताळावे लागते. तृतीयपंथीयांचा विषय हा प्रशासनाच्यादृष्टिने तेवढाचा भावनिक व संवेदनशील असा होऊन जातो. अनेकदा त्यांच्याबाबत घेतलेले चांगले निर्णय काही प्रसंगी बदलावे लागतात. स्मशानभूमीसारखा अत्यंत महत्त्वाचा व तेवढाच गरजेचा असल्याने हा निर्णय व जागा देण्याचे आदेश पारीत करतांना न कळत एक आत्मिक समाधान लाभल्याच्या प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
हक्काच्या स्मशानभूमीत आता माणूस म्हणून विसावता येईल
जो जन्म वाट्याला आला त्याबद्दल कोणतीही तक्रार न करता आम्ही किन्नर, तृतीयपंथी जीवनातले सुख, दु:ख साजरे करतो. आमच्या हक्काची ही अनेक दिवसांपासूनची आमची मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पूर्ण करून आम्हाला दिवाळीची भेट दिली आहे. आता मृत्यूनंतर कुठे विलीन व्हायचे याची चिंता राहिली नसून हक्काच्या स्मशानभूमीत माणूस म्हणून विसावता येईल या शब्दात तृतीयपंथी किन्नर फरिदा शानूर बकश हिने शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या: