मुंबई : आज पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचे मोठे महत्व आहे. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठे महत्व मिळाले आहे.
महाराष्ट्रात देखील योगदिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाला. नांदेडमध्ये लोकांच्या विक्रमी उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह योग केला तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात योगाभ्यास केला. सोबतच राज्यात जागोजागी योगदिनाच्या निमित्ताने योगाभ्यास आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांचा रामदेव बाबांसह योगा
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी योगासनं सादर केली. यावेळी योगगुरु रामदेव बाबांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो जणांनी योग प्रात्यक्षिकं केली. मुख्यमंत्र्यांसोबत अंदाजे एक लाख जणांना एकाच वेळी योगासनं करता येतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी योगाचा प्रचार आणि प्रसार जगभरात केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
गेटवे ऑफ इंडियावर शिल्पा शेट्टीच्या उपस्थितीत योगा
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. पतंजली योग पीठ आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शेट्टी, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, CISF चे अधिकारी आणि जवान उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मार्गदर्शन करताना म्हटले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी 21 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जावा म्हणून प्रयत्न केले. लोकांनी रोज योग करायला हवा. योग भारताने जगाला दिला ज्याच्या मला अभिमान आहे, असेही शिल्पा शेट्टी यावेळी म्हणाली.
नागपुरात केंद्रीय मंत्री गडकरींचा योगाभ्यास
नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी योगासनं केली. यशवंत स्टेडिअममध्ये सामान्य नागपूरकरांसोबत गडकरींनी पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. नागपूर महापालिका, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ आणि नेहरू युवा केंद्र यांनी संयुक्तरीत्या विश्व योग दिवसाच्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दहा हजार अमरावतीकरांचा योगा
अमरावती येथे जागतिक योग दिनानिमित्त सकाळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळच्या मैदानात आज सकाळी 10 हजार अमरावतीकरांनी एकत्र येऊन योगा केला. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, पतंजली योग समिती आणि अमरावती महानगरपालिका यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये अमरावती येथील अनेक नेतेमंडळींसोबतच शहरातील नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
प्रवीण आखरेंचा पाण्यावर तरंगत योगा
जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने अमरावती शहर पोलीस दलात कार्यरत असलेले प्रवीण आखरे यांनी पाण्यावर तरंगत योगाची विविध प्रात्यक्षिक केले. प्रवीण आखरे हे वयाच्या बाराव्या वर्षापासून स्विमिंग करत आहे. सध्या अमरावती येथील पोलीस दलाच्या जलतरण तलावामध्ये ते मार्गदर्शन करतात. पाण्यावर तरंगत आखरे हे मस्त्यासन, पद्मासन, शवासन, सिद्धासन, पवनमुक्तासन यासह योगाचे विविध प्रकार ते करतात.
नवी मुंबईकरांचा वीरभद्रासन करण्याचा विक्रम
पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त नवी मुंबईकरांनी आज वीरभद्रासन करण्याचा विक्रम केला आहे. वाशी येथील सिडको एग्झिबिशन हॉलमध्ये झालेल्या या वीरभद्रासन विक्रमास 737 जणांनी उपस्थिती लावली होती. सलग 3 मिनिट वीरभद्रासन करून गिनिज वर्ड रेकॉर्ड करण्यात आला. विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, नवी मुंबई सिटीझन फाऊंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि सिडकोच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
परभणीच्या कृषी विद्यापीठात सामूहिक योगासनं
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सामूहिक योगासनं करण्यात आली. कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ अशोक ढवण यांच्यासह विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राचार्य, प्राध्यापक यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थीनी अशा एकूण 4000 जणांनी एकाच वेळी योगासनं केली.
संबंधित बातम्या
nternational Yoga Day : योगामुळे गरिबी दूर होण्यास मदत होईल, योगदिनी पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन
आज पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस, 'या' प्राचीन भारतीय पद्धतीला अशी मिळाली जगमान्यता
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
International Yoga Day | आंतरराष्ट्रीय योगदिनाचा राज्यभरात उत्साह, नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांचा रामदेव बाबांसह योगा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jun 2019 08:38 AM (IST)
महाराष्ट्रात देखील योगदिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाला. नांदेडमध्ये लोकांच्या विक्रमी उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह योग केला तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात योगाभ्यास केला. सोबतच राज्यात जागोजागी योगदिनाच्या निमित्ताने योगाभ्यास आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -