नागपूर : केंद्रात आंध्र प्रदेशातील टीडीपीने भाजपाला डच्चू दिला आहे, तर राज्यात शिवसेनाही सतत खो देण्याच्या पावित्र्यात असते. आगामी निवडणुकीला एकच वर्ष उरल्यामुळे राजकीय पक्षांचा निवडणुकीचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. राज्यात भाजपसाठी येत्या निवडणुकीत सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते ती म्हणजे, अंतर्गत वैमनस्य, हेवे -दावे आणि शिरजोरीचं राजकारण.

गेल्या 4 वर्षात मुख्यमंत्र्यांनी प्रकाशझोतात आणलेली, झटकन बलशाली झालेली एक युवा नेत्यांची पिढी याला कारणीभूत ठरली आहे. अशी पिढी, की जिने आपापल्या भागातील प्रस्थापित नेत्यांसमोर आव्हान उभं केलं.

एकेकाळी ज्या पद्धतीची खुली चढाओढ आणि हेवे-दावे मोठ्या प्रमाणात फक्त काँग्रेसमध्ये दिसून यायचे, ते चित्र आता भाजपच्या पटलावर राज्यात बघायला मिळत आहे. थेट मुंबईपासून ते विदर्भापर्यंत अशी अनेक भाजप नेते आहेत, ज्यांच्यात टोकाचा वाद आहे.

खरं तर राज्यातील भाजप सरकारची सुरुवातच मुळात नितीन गडकरी विरूद्ध देवेंद्र फडणवीस अशी झाली होती. आमदारांनी त्यावेळी फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर होणार, असं समजताच, गडकरी यांच्या वाड्यावर रांग लावून, त्यांना आपलं समर्थन जाहीर केलं होतं.

तो वाद पुढे महाराष्ट्राच्या आणि खास विदर्भाच्या भल्यासाठी या दोन्हीही नेत्यांनी परिपक्वता दाखवत संपुष्टात आणला. पण इतर ठिकाणी मात्र भाजपातील सामने निवडणूक जशी-जशी जवळ येत आहे, तस-तसे जास्तच रंगत आहेत.

राज्यातील भाजपाचे काही महत्त्वाचे सामने

  • विनोद तावडे विरुद्ध आशिष शेलार (मुंबई)

  • संजय काकडे विरुद्ध गिरीश बापट (पुणे)

  • संजय धोत्रे विरुद्ध रणजित पाटील (अकोला)

  • एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन (जळगाव)

  • अनिल गोटे विरुद्ध जयकुमार रावल (धुळे)


खासदार संजय धोत्रे हे आपल्याच सरकारमधील मंत्री रणजित पाटील यांच्यावर कारवाईची मागणी करतात, थेट मुख्यमंत्र्यांना 15 दिवसांचं अल्टीमेटम देतात, तर अनिल गोटे हे आपल्याच पक्षाच्या जयकुमार रावलांकडे भ्रष्टाचाराचे बोट दाखवतात.

उत्तर महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक एकनाथ खडसेंच्या कार्यक्रमात उपस्थित राहत नाहीत. तर खडसेंच्या समर्थकांना आपल्याच पक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांना फारसे मोजावेसे वाटत नाही.

पुण्यातही परिस्थिती काही वेगळी नाही. गिरीश बापट पुणे बघू शकतात, मला फक्त पुण्यापर्यंत मर्यादित राहायचं नाही, असं म्हणत खासदार संजय काकडे चिमटे काढतात.

मुंबईत विनोद तावडे आणि आशिष शेलार आमने-सामने आहेत. मात्र थेट राजधानीच्या नेतृत्वाची, मुंबईतील भाजपाच्या चेहऱ्याची चढाओढ आहे. एकेकाळी एकत्र असणाऱ्या आणि गडकरींच्या जवळ असणाऱ्या या दोघांमध्ये विनोद तावडे हे स्वाभाविक मोठे नेते होते, मुंबईतील भाजपाचा चेहरा होते. पण सत्ता आली, तावडेंची बरीच जागा ही आशिष शेलार यांनी घेतली आणि आताही घेत आहेत. या सर्व अंतर्गत वादांचं विश्लेषण वेगवेगळी लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात.

हा अंतर्गत वाद प्रस्थापित विरुद्ध नवोदित नेते तर आहेच, तसाच हा आपले आणि बाहेरचे असाही आहे. महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून जेव्हा लाभले, तेव्हा भाजपने हा विचारही केला नसेल, की युवा मुख्यमंत्र्यांची कंफर्ट-लेव्हल ही त्यांच्यासारख्याच तरुण, टेक्नोसॅव्ही नेत्यांबरोबर राहील. त्यामुळे एकनाथ खडसे असतानाही गिरीश महाजन, संजय धोत्रे असतानाही रणजित पाटील, संजय कुटे, अनिल गोटे असताना जयकुमार रावल, नाना पटोले असताना परिणय फुके यांचं महत्त्व वाढेल, असं त्यावेळी वाटलं नसेल.

किंबहुना, प्रत्येक नेता हा पक्षाची ताकद वाढवताना पहिले आपली ताकत वाढवत असतो हा राजकारणाचा दुसरा नियम आहे. तेच देवेंद्र फडणवीस यांनीही केलं. त्यामुळेच संजय काकडे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, नारायण राणे अशी ही मंडळी बाहेरुन पक्षाच्या जवळ आली. त्यांना तिकिटं, पदं मिळाली आणि ती अजून मोठी झाली.

युती तुटली तर शिवसेनेचे उमेदवार हे भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात खुल्या रिंगणात उतरतील. पण आतील गनिमीकाव्याचं काय? हा विचार भाजपला करण्याची वेळ राज्यात तरी आलेली आहे.