वर्धा : जितकी मोठी स्वप्नं, तितक्या अडचणी, असे म्हटलं जातं. अनेकजण अडचणींना घाबरुन मागे सरतात, तर काही जण खचून न जाता अडचणींचा डोंगर भेदून आकाशाला गवसणी घालतात. वर्धा जिल्ह्यातील श्रीदेव वानखडे म्हणजे आकाशाला गवसणी घालणाऱ्या ध्येयवेड्यांपैकी एक.
श्रीदेव वानखडे... सर्वसामान्य तरुणांसारखाच एक तरुण. मित्रांसोबत बागडणारा अन् हसतमुख चेहऱ्याचा. मात्र, श्रीदेवमध्ये एक गोष्ट वेगळी आहे, ती म्हणजे परिस्थिती कुठलीही असो, तिच्यावर मात करुन जगण्याची. असाच एक संघर्षमय आणि तितकाच प्रेरणादायी प्रसंग श्रीदेवच्या रुपाने सर्वांसमोर आला आहे.
श्रीदेवच्या घरी सध्या पुष्पगुच्छ आणले जात आहे, फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडियावरुनही ‘Congratulations’चे हजारो मेसेज धडकत आहेत. इतकंच काय, श्रीदेवला शुभेच्छा देण्यासाठी अनेकजण थेट त्यांचं घर गाठत आहेत. या सर्वाला कारणही तसंच आहे. श्रीदेवच्या आताच्या आनंदी क्षणामागे दु:खाचं मोठं डोंगर आहे.
एका अपघातात स्पायनल कॉडला इजा झाली आणि श्रीदेवचं होत्याचं नव्हतं झालं. आयुष्याचं पार विस्कटून गेलं. सर्व स्वप्न जागच्या जागी निपचित पडले. मात्र, श्रीदेवने हे सारं दु:ख चेहऱ्यावर दिसू दिले नाहीत.
2011 साली अपघात झाला, त्यानंतर दोन वर्षे अत्यंत त्रासाचे गेले. एरवी मित्रांसोबत बागडणारा श्रीदेव अपघातानंतर जागच्या जागी बसला होता. पण या घटनेनंतर निपचित पडलेल्या स्वप्नांना त्याने निराश केले नाही. अपघातानंतर स्वत:ला सावरत, नव्या उर्जेने काम करु लागला. अपघातामुळे चार भिंतीत कोंडून राहावं लागलं, मात्र, त्याने स्वप्नांची त्या चार भिंतीत घुसमट होऊ दिली नाही.
अफाट पसरलेल्या अभाळाकडे पाहत त्याने स्वप्नांमध्ये ताकद भरली आणि नव्या उत्साहाने जगण्याकडे पाहिलं. मग काय, लढायचं, हारायचं नाही, असे म्हणत तो पुढे सरसावला.
2014 साली अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा मराठी करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी होत पहिल्या 10 स्पर्धकांमध्ये पोहोचला. मात्र, तिथे काहीशी निराशा हाती आली.
श्रीदेवने निराश न होता पुन्हा प्रयत्न सुरु केले आणि दोन वर्षांनी पुन्हा संधी चालून आली. या संधीचं सोनं करायचं, हे ठरवूनच श्रीदेव मैदानात उतरला. त्याने स्वप्निल जोशीच्या ‘कौन बनेगा मराठी करोडपती’ कार्यक्रमात यंदा पुन्हा सहभाग घेतला आणि आपल्या तल्लख बुद्धी आणि हुशारीने थेट 50 लाखांच्या बक्षीसाला गवसणी घातली.
श्रीदेवच्या या आनंदाच्या क्षणावेळी 5 वर्षांपूर्वी दुःखावर पांघरून घातलं आहे. ‘कोण बनेगा मराठी करोडपती’मध्ये श्रीदेव आणि त्याची बहीण सुदर्शनीने चक्क सगळे पडाव पार करत 50 लाखाचं बक्षीस मिळवलं आहे.
श्रीदेवची ही सुरुवात आहे, त्यांची स्वप्नं मोठी आहेत. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याचं श्रीदेवचं स्वप्न आहे. त्यादृष्टीने तो वाटचालही करत आहे.
एकीकडे यशाच्या पायऱ्या श्रीदेव पार करत आहे, तर दुसरीकडे त्याच्या कुटुंबीयांनी तो चालेल, याची आशा सोडलेली नाही. बक्षीसाच्या रकमेतून श्रीदेववर उपचार केला जाणार आहेत. तो पुन्हा चालेल, याची सर्वांनाच आशा आहे.
विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांचा संघर्षाचा काळ पाहूनही श्रीदेवच्या मनाला नकारात्मकतेने किंचितही स्पर्श केला नाही. धडधाकट माणसालाही लाजवेल, असे त्याचे स्वप्न आहेत. त्याच्या शब्दा-शब्दातून ते जाणवत राहतात.
मनात स्वप्न, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंगातल्या नसानसात जबर इच्छाशक्ती आणि कितीही संघर्ष करण्याची तयारी. बस्स, हेच आहे श्रीदेवच्या यशाचं गमक.