पणजी : संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा एका वादग्रस्त विधान केलं आहे. टीका करणाऱ्या गोवा मीडियाच्या एका गटावर निशाणा साधताना पर्रिकर म्हणाले की, प्रसिद्धी मिळवण्यासाठी विवस्त्र होऊन नाचा.

पणजीमधील भाजपच्या एका सभेत मनोहर पर्रिकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. पर्रिकर म्हणाले की, "मला अजूनही लक्षात आहे, 1968 मध्ये वॉटरगेट प्रकरणावर अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना सल्ला देताना एका मराठी संपादकाने भलामोठा अग्रलेख लिहिला. आता अग्रलेख मराठीत असल्याने तो निक्सनपर्यंत कसा पोहोचणार? निक्सन तर अमेरिकेत होते."

गरज पडल्यास भारत पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करेल : पर्रिकर


 

गोव्यातील प्रादेशिक भाषेच्या एका संपादकाचा उल्लेख करताना मनोहर पर्रिकर म्हणाले की, "काहींना त्यांच्या मर्यादा माहित नसतात. ते वायफळ बडबड करतात. त्यांच्यासाठी माझ्याकडे काही चांगले सल्ले आहेत. विवस्त्र व्हा आणि नाचा. आणखी चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी मिळवता येते."

"प्रसिद्धी मिळवण्यासाठी मीडियाचा दुरुपयोग करणाऱ्यांना मी एक सल्ला देतो. इथून एक वृत्तपत्र प्रकाशित होत असे, आताही होतं. मी त्याचं नाव घेणार नाही. त्याचे एक संपादक आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील संपादक होते. वृद्धापकाळात त्यांना इथे आणलं. त्यांच्या वृत्तपत्राच्या केवळ एक हजार प्रतींची विक्री होत असे," असंही पर्रिकर म्हणाले.

 

सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय संघाच्या प्रशिक्षणाला : मनोहर पर्रिकर

याआधी अणुबॉम्ब वापरासंबंधातील भारताच्या धोरणाला छेद देणारं वक्तव्य मनोहर पर्रिकर यांनी केलं होतं. गरज पडल्यास भारतही पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करु शकतो. पण त्याचबरोबर भारत एक जबाबदार देश असून आम्ही अण्वस्त्रांचा बेजबाबदारपणे वापर करणार नाही, असंही ते म्हणाले होते.

तर अहमदाबादमधील निरमा यूनिव्हर्सिटी आयोजित “सैन्याला जाणून घ्या” या कार्यक्रमात पर्रिकर यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षणाला दिलं होतं. पर्रिकर म्हणाले, "पंतप्रधान मोदी हे महात्मा गांधी यांच्या राज्यातून आहेत आणि संरक्षणमंत्री गोव्यातून आहे. त्यामुळे यानुसार सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय संघाच्या प्रशिक्षणाला जातं."