मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणातील खटल्यातील या टप्यावर साक्षीदारांच्या विश्वासार्हता किंवा विश्वसनियतेवर प्रश्नचिन्ह उभे करून प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर करणे म्हणजे संपूर्ण खटल्याचा पायाच डळमळीत करण्यासारखे आहे. असे स्पष्ट करत सीबीआयने गुरुवारी पुन्हा एकदा इंद्राणी मुखर्जीच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.
शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीनं पुन्हा एकदा जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. इंद्राणीनं वैद्यकीय कारणांसाठी दाखल केलेल्या या जामीन अर्जावर सीबीआयनं उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्यानं हायकोर्टानं तीन आठवड्यांचा अवधी देत सुनावणी 22 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली. तसेच भायखळा जेल प्रशासनालाही इंद्राणीचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर यावर सोमवारी सुनावणी झाली. इंद्राणीनं जामीनासाठी केलेला हा सहावा अर्ज आहे.
आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात विसंगतपणा असून साक्षीदारांच्या नोंदविण्यात आलेली साक्षीतही विश्वासाहर्ता नाही तसेच या खटल्यातील माफीचा साक्षीदार श्यामवर राय याची जबानी विश्वासार्ह नसल्याचा दावा इंद्राणीच्यावतीनं या याचिकेतून केला गेला आहे. इंद्राणीच्या या अर्जाला सीबीआयच्यावतीने जोरादार विरोध करण्यात आला. आरोपीला जामीन देताना न्यायालयाने ठोस कराणावरच जामीन द्यावा, कारण, खटल्याच्या या टप्यावर साक्षीदारांच्या विश्वासार्हता किंवा विश्वसनियतेवर प्रश्नचिन्ह उभे करून प्रमुख आरोपीला जामीन मंजूर करणे म्हणजे संपूर्ण खटल्याचा पायाच डळमळीत केल्यासारखे होईल असा युक्तिवाद सीबीआयाच्यावतीनं केला गेला.
एप्रिल 2012 मध्ये झालेल्या शीना बोरा हत्याकांडात तिची आई इंद्राणी ही इतर दोन आरोपींसह हत्येचा आरोपाखाली अटकेत आहे. ऑगस्ट 2015 मध्ये तिचा ड्रायव्हर श्यामवर रायला बेकायदेशीर शत्र बाळगल्या प्रकरणी अटक केल्यानंतर त्याने या धक्कादायक गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. यामुळे इंद्राणी आणि तिचा माजी पती संजीव खन्ना यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी इंद्राणी यांचे पती पीटर मुखर्जी यांनाही नंतर हत्येच्या कटात सहभागी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पीटर मुखर्जी हे सध्या जामीनावर बाहेर आहेत.
संबंधित बातम्या :