मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीनं आता एका नव्या तक्रारीसह मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कैद्यांसाठीचे कपडे घालण्यास इंद्राणी मुखर्जीनं नकार दिला आहे. इंद्राणी सध्या कैद असलेल्या भायखळा जेलचे अधिकारी तिला कैद्यासाठी असलेली हिरवी साडी नेसण्यास सक्ती करत असल्याचा विरोधात करत इंद्राणी मुखर्जीनं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात याचिका दाखल केली आहे.


शीना बोरा हत्याकांड खटल्याचा निकाल लागणं अद्याप बाकी असल्यानं आपण सध्या प्रलंबित खटल्यातील 'कच्चे' कैदी आहोत. आपल्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत, तसेच कोर्टाचा अंतिम निकालही लागलेला नाही. त्यामुळे शिक्षा झालेल्या एखाद्या 'पक्क्या' कैद्यांप्रमाणे जेल अधिकारी आपल्याला जेलचे कपडे घालायला सक्ती कशी करू शकतात?, इतर कैद्यांप्रमाणे आपल्याला वागणूक मिळत असल्याला इंद्राणीनं या याचिकेतून विरोध केला आहे. कोर्टानं या याचिकेची दखल घेत 5 जानेवारीपर्यंत भायखळा जेल प्रशासनाला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.


24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर राय याला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. रायची चौकशी केल्यानंतर या भयानक हत्याकांडाचा साल 2015 मध्ये उलगडा झाला. इंद्राणीने आपला पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्यासोबत मिळून आपल्या पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीलाही या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक झाली होती.


संबंधित बातमी :


शीना बोरा हत्याकांड प्रकरणी इंद्राणीच्या जामिनास सीबीआयचा विरोध कायम