Prakash Ambedkar On Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांना भिमा कोरेगाव प्रकरणी क्लीनचिट दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. एबीपी माझाशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की,  ज्या तपास अधिकाऱ्यानं हे क्लीनचिट दिलं आहे त्यानं सुप्रीम कोर्टात दिलेलं अॅफिडेबिट वाचलेलं नाही.  त्यात सुप्रीम कोर्टाला असं कळवलं आहे की, संभाजी भिडे आणि एकबोटे दोषी आहेत. त्यामुळं तपास अधिकाऱ्यानं कुणाच्या तरी सांगण्यावरुन क्लीनचिट दिली आहे. तपास अधिकाऱ्याने सर्वोच्च न्यायालयात जे अॅफिडेबिट दिलेय त्यामध्ये भिडेंना दोषी ठरवलंय. आता भूमिका बदलल्यास तो तपास अधिकारीच विटनेस बॉक्समधे येईल. त्या अधिकाऱ्याला ग्रामीण पोलिसांनी सुप्रीम कोर्टात दिलेल्या अॅफिडेबिटचा सामना करावा लागेल. 


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, या निकषावर तपास अधिकारी आले कसे हा महत्वाचा भाग आहे. कोर्टात अजून यांचं नाव डिलिट करावं अशी कायदेशीर प्रक्रिया केलेली नाही, तिथं विरोध केला जाणार आहे. तपासासंदर्भातील कागदपत्रे तिथं मागवली जातील. 


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील संभाजी भिडेंच्या पाया पडतात. त्यामुळं लक्षात घेतलं जावं की सूत्रं कुठून हालत असतील. हा सगळा फ्रॉड आहे आणि त्याची कागदपत्रं माझ्याकडे आहेत असं शरद पवारांनी म्हटलं होतं. राष्ट्रवादीमधील दुफळी बाहेर येतेय, असं मला वाटतं,असंही ते म्हणाले.


आंबेडकर यांनी म्हटलं की,  ही सगळी साखळी आहे. सुप्रीम कोर्ट दोषी मानतं आणि तुम्ही त्यांना निर्दोष म्हणता. मात्र नाव वगळल्यानं हे प्रकरण मिटणार नाही. त्या 39 जणांनी कुणाच्या सांगण्यावरुन केलं. कुठल्याही गुन्ह्याला मायबाप असतो. हे सगळं समोर येईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपचाही यात पूर्ण रोल आहे. इथल्या कुठल्याही यशस्वीपणे सत्ता राबवायची असेल तर ज्या टेरेरिस्ट ऑर्गनायझेशन आहेत त्यांचा परिचय पोलिसांना करुन दिला पाहिजे. नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस अधिकाऱ्यांना एका ठराविक विचारसरणीचे लोकच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असतात अशी शिकवण दिली जाते.  दुसऱ्या बाजूच्या लोकांबद्दल ते बोलत नाहीत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्ष ओबीसींना आरक्षण मिळू देणार नाहीत


ओबीसी आरक्षणावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्ष ओबीसींना आरक्षण मिळू देणार नाहीत. जाणीवपूर्वक इमपीरिकल डेटा गोळा केला जात नाही. ओबीसी आणि बहुजन समाजाने राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद न देऊन ते शहाणे होत असल्याच दाखवून दिलंय. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आरक्षण विरोधी आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.