काहीही झालं तरी कोरोनाला हरवणार; भिवंडीतील आदिवासी कुटुंब पाच दिवस उपाशी
लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने भिवंडी तालुक्यातील भिणार येथील आदिवासी पाड्यावर असलेल्या गरीब कुटुंबाला मागील पाच दिवसापासून फक्त पाणी आणि कंदमुळे खाऊन जगावं लागत आहे.
भिवंडी : कोरोना व्हायरसमुळे देशात सध्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे कारखाने, गोडाऊन तसेच सर्व रोजगार बंद झाले आहेत. अनेक कुटुंब जे रोजंदारीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती, त्यांच्यावर रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. भिवंडी तालुक्यातील भिणार येथील आदिवासी पाड्यावर असलेल्या गरीब कुटुंबांना रोजगार नसल्याने मागील पाच दिवसापासून फक्त पाणी आणि कंदमुळे खाऊन जगावं लागत आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी हे कुटुंब मागील पाच दिवसांपासून घरातच आहे. मात्र काहीही झालं तरी चालेल पण कोरोनाला हरवणार हा त्यांचा निश्चय दृढ आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी घरात थांबावे असे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी टाळावी, घरातच राहावे, बाहेर फिरु नये, असे प्रशासनाकडून वारंवार सांगूनही काही जण रस्त्यावर, गल्लीत फिरताना दिसून येत आहेत. मात्र भिवंडी तालुक्यातील भिणार येथील आदिवासी पाड्याच्या हेंगाडे कुटुंब मागील पाच दिवसांपासून फक्त पाणी पीत उपाशी पोटी राहून कोरोनाला हरवण्यासाठी घरातच थांबून आहे.
'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी सांगितलं की, "काम करुन 100 ते 200 रुपये मिळायचे. त्यावर आमचं पोट चालत होतं. मात्र कोरोनामुळे सर्व काम बंद झालं आहे. त्यामुळे जेवणाचे खूप हाल होत आहेत. मुलं जेवणामध्ये भात, चपाती मागतात पण पैसे नसल्याने ते शक्य नाही. त्यामुळे पाणी पिऊन उपाशीपोटीच झोपावं लागत आहे. तसेच रस्त्यावर जे थोडे थोडे तांदूळ पडलेले असतात ते वेचून आणले आहे. त्याचा भात बनवू परंतु काहीही झाले तरी चालेल पण कोरोनाला हरवण्यासाठी आम्ही घरातच राहणार." परिस्थिती एवढी बिकट असूनही जर हे कुटुंब घरात थांबू शकत तर इतर लोक का घरात थांबू शकत नाही, असा प्रश्न आहे. घराबाहेर विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांसाठी हेंगाडे कुटुंबाचं चांगलं उदाहरण आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे बेरोजगार, कामगार, भिक्षुक यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी विविध सामाजिक संस्थानी पुढाकार घेतला आहे. भिवंडीतील जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेच्या वतीने महादेव आंबो घाटाळ यांनी भिनार येथील आदिवासी पाड्यामध्ये उपसरपंच सुरेखा किसन भोईर यांना घेऊन सर्वेक्षण केलं. काम नसल्याने कुटुंबावर अक्षरशः उपासमारीची वेळ आल्याचे समजताच, त्यांनी संस्थेच्या वतीने या गरीब कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू, तांदूळ, तेल, साखर, मसाला, तेल, पीठ, डाळ, विविध कडधान्य असं जवळपास एक महिन्याच्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं आहे. जीवनाश्यक वस्तू घेताना आमच्या घरी देव माणूस आला आहे असं म्हणत हेंगाडे कुटुंबाने महादेव घाटाळ यांचे आभार मानले.