पुणे : एकीकडे मोदी सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करते आहे. पण बँक शेतकऱ्यांना लुटते का असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्याच्या खात्यातून एकाच दिवशी तब्बल 104 व्यवहार दाखवून 354 रुपये प्रमाणे महाराष्ट्र बँकेने खात्यातून कट केले आहेत. इंदापूर तालुक्यातील सणसर मधील महाराष्ट्र बँकेत हा प्रकार घडला आहे. अजीज तांबोळी यांचे एकाच दिवशी 37 हजार रुपये बँकेने कट केले आहेत तर अरुण रायते यांचे जवळपास 12 हजार रुपये कट केले आहेत. खातेदारांचे पैसे आमच्याच मुख्य कार्यालयातून कापून घेतल्याचे बँकेने सांगितले आहे.
मोदी सरकार हे थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात पैसे जमा करते म्हणून डंका वाजवते. परंतु बँक मात्र शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एकाच दिवशी जवळपास दोन जणांच्या खात्यातून जवळपास 45 हजार रुपये कट करून घेतले आहे. इंदापूर तालुक्यातील सणसर येथील अजीज तांबोळी यांच्या खात्यातून एकाच दिवशी 104 वेळा 354 रुपये प्रमाणे महाराष्ट्र बँकेने पैसे कट करून घेतले आहे. त्याच प्रमाणे अरुण रायते यांच्या खात्यातून एकाच दिवशी 24 वेळा 354 प्रमाणे पैसे कट केले आहेत.
बँकेने पैसे कट केले
अजीज तांबोळी यांनी बजाज फायनान्सकडून 5 लाख रुपये कर्ज घेतले. कोरोना काळात त्यांचे हप्ते थकले. कालांतराने त्यांनी हप्ते व्यवस्थितरित्या सुरू होतं. एप्रिल महिन्यात त्यांचं उसाचे बिल महाराष्ट्र बँकेत जमा झाले. त्यातील 6 हजार रुपये तांबोळी यांनी काढले. त्यांनंतर 4 एप्रिल 2022 मध्ये एकाच दिवशी तब्बल 104 व्यवहार होऊन. प्रत्येक व्यवहारावेळी 354 रुपये प्रमाणे त्यांचे पैसे बँकेतून कट केले आहेत. एका दिवसात 354 रुपये 104 वेळा कट झालेत. तांबोळी यांच्या सारखेच अरुण रायते यांच्या देखील खात्यातील 354 रुपये प्रमाणे एकाच दिवसात 24 वेळा पैसे कट झाले आहेत. रायते यांनी गाडीसाठी कर्ज घेतले होते. त्यांचे हप्ते संपल्यानंतर बँकेने पैसे कट केल्याचे रायते यांनी सांगितले.
जाब विचारल्यानंतर उडवा-उडवीची उत्तरं
पैसे कट झाल्यानंतर रायते आणि तांबोळी यांनी बँकेत धाव घेतली. बँकेनी बाजाज फायनान्सकडे बोट दाखवले. हे दोघेही बारामती येथील बजाज फायनान्स कंपनीत आले. बाजज कंपनीला विचारांना केली असता. हे पैसे आम्ही कट केले नाहीत हे पैसे बँकेने कट केल्याचं सांगितले. त्या संतप्त दोघे जण बँकेत गेले आणि त्यांनी पुन्हा बँकेने उडवा उडवीची उत्तर दिली.
ज्या काळात आम्ही हप्ते भरले नाहीत. त्या काळातील दंड बँकेने घ्यावा असं तांबोळी यांचं म्हणणं आहे. पंरतु एकाच दिवशी तब्बल 104 वेळा व्यवहार केल्याने तांबोळी चांगलेच संतप्त झालेलं पाहायला मिळले. जर बँकेने पैसे दिले नाहीत तर तांबोळी हे बँकेच्या विरोधात पोलिसांत तक्रार देणार आहेत.
या संदर्भात जेव्हा एबीपी माझाने इंदापूर तालुक्यातील सणसर मधील महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणी केली असता बँकेच्या अधिकाऱ्यांनी कंपन्यांनी इसिएस केल्याने हे पैसे कट झाले आहेत. मुंबईच्या मुख्य शाखेने हे पैसे कट केल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
फायनासचे कर्ज फेडले असताना आणि काहींचे हप्ते सुरळीत असताना बँकेने हे पैसे कशाच्या आधारे कट केले असा सवाल खातेदार विचारत आहेत. त्यामुळे आता शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. जर शेतकऱ्यांचे पैसे बँकेने दिले नाहीत तर बँकेच्या दारात गाढवं बांधून आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. एकीकडे मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार होते. ते तर पैसे टाकणे बाजूला राहिले परंतु शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारण्याचे काम सुरु आहे. शेतकरी महागाईमुळे त्रस्त झालेला आहे तरी बँकेची अशा प्रकारची वागणूक ही शेतकऱ्यांची लूट करणारे आहे तरी बँकेने तात्काळ पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत अन्यथा बँकेच्या दारात गाढव बांधून आंदोलन करू असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते यांनी दिला आहे.
अशा पद्धतीने पैसे कापून बँकेने नियमबाह्य काम केले असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे आता जर बँकेने पैसे परत केले नाहीत तर शेतकरी बँके विरोधात पोलिसात धाव घेणार असल्याची माहिती तांबोळी आणि रायते यांनी दिली त्यामुळे आता बँक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार का आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणार का हा खरा प्रश्न आहे.