धुळे : नाशिक परिक्षेत्रात पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. गेल्या सहा महिन्यात पोलिसांनी शेकडो अवैध शस्त्र जप्त केलीच, त्यासोबत तडीपार, फरार आणि वॉण्टेड आरोपी/गुन्हेगारांवर कारवाई केली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर पाटील यांनी पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. मागील सहा महिन्यात नाशिक परिक्षेत्रात पोलिसांनी केलेल्या विविध कारवाईबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
विशेष मोहिमेतील पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर पाटील यांनी पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात केलेल्या कामगिरीबाबत त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, "नाशिक परिक्षेत्रात अवैध शस्त्र, तडीपार, फरार आणि वॉण्टेड आरोपींसंदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये 145 अवैध पिस्टल किंवा कट्टे, 204 काडतुसे, 2 एअर पिस्टल जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय 298 तलवारी, 45 सुरे आणि चाकू पोलिसांनी ताब्यात घेतले. तसंच 156 विविध गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचबरोबर अनेक वर्षांपासून फरार असलेल्या 16 आरोपींना पकडण्यात यश आलं आहे. याशिवाय 489 विविध गुन्ह्यातील वॉण्टेड आरोपींना या मोहिमेत अटक करण्यात आली. तर 220 तडीपार आरोपी किंवा गुन्हेगार यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे."
गेल्या सहा महिन्यातील नाशिक परिक्षेत्रातील विविध कारवाया पुढीलप्रमाणे
- 145 अवैध पिस्टल
- 204 अवैध काडतुसे
- 2 अवैध एअर पिस्टल
- 298 तलवारी
- 45 सुरे आणि चाकू
- 156 विविध गुन्ह्यातील आरोपी
- 16 फरार आरोपींना पकडण्यात यश
- 489 विविध गुन्ह्यातील आरोपींना अटक
- 220 तडीपार आरोपींवर कारवाई
धुळे पोलिसांच्या एकाच दिवशी विविध ठिकाणी चार कारवाया
हरियाणा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेला गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जाणारा मद्यसाठा धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 8 लाख 81 हजार 40 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासोबतच शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील किरण उर्फ कमलेश गवा भिल (वय 20 वर्ष) कडून चार हजार रुपये किमतीच्या चार लोखंडी तलवारी तसेच आठशे रुपये किमतीच्या एकूण चार तलवारीचे लाल रंगाचे कव्हर असा एकूण 4 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विहिरीतील पाण्याच्या मोटारी चोरीला जात असल्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. याबाबत कारवाई करत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने विविध ठिकाणी कारवाई करत तब्बल 10 मोटारी जप्त केल्या आहेत.