गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या भुसेवाडा आणि गुंडेनूर येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधलेला बांबूचा पूल सध्या चर्चेत आहे. ग्रामपंचायत मल्लमपोडुर अंतर्गत असलेल्या भुसेवाडा गावाच्या 2 किलोमीटर आधी एक बारमाही वाहणारा नाला आहे. तर लाहेरी गावापासून 4 किलोमीटरवर अंतरावर गुंडेनूर नाला आहे. या नाल्याला बाराही महीने पाणी असल्याने नाल्यावर पूल बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष करण्यात आलं आहे .
गुंडेनूर नाल्यावरील नागरिकांसाठी पावसाळ्यात बिकट परिस्थिती उद्भवते. स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून मार्गक्रमण करीत नाला पार करावा लागतो. यावर काय उपाय करता येईल यासंबंधी गावकऱ्यांनी स्वतः निर्णय घेऊन येथील नाल्यावर बांबू पूल तयार करण्याचे ठरवले. भुसेवाडा आणि गुंडेनूर गावात जाण्यासाठी 3-4 वर्षांपूर्वी कच्चा रस्ता बनविण्यात आला. मात्र बारमाही वाहणारा मोठा नाला ग्रामस्थांसाठी मोठा अडसर ठरला. पूल नसल्याने गावातील नागरिकांना रात्री- बेरात्री धोकादायक घनदाट जंगलात कमरेभर पाण्यातून वाट काढत जावं लागतं. त्यात रात्री कोणी आजारी पडल्यास रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध होत नाही. पायी वाट काढणं देखील जिकिरीचे ठरत होते. गरोदर मातेच्या बाळंतपणासाठी आशा वर्कर यांना प्राथमिक उपकेंद्र येथे माहिती देण्यास जाण्याकरिता पाण्यातून वाट काढायला खूप त्रास सहन करावा लागायचा. या भागात येणाऱ्या या विदारक समस्यांचं चित्र एबीपी माझाने वारंवार दाखवून प्रशासनाचे लक्ष वेधल आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात भामरागड तालुक्यातील दुर्गम भागात दुर्दैवी दोन घटना घडल्या
भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा तुरेमर्का गावातील एक गरोदर माता आपल्या प्रसूतीसाठी घनदाट जंगलातून वाटेत पडणारे नदी नाले ओलांडून तब्बल 23 किलोमीटर पायवाट करत प्राथमिक उपकेंद्रात पोहचली होती आणि तिने गोंडस मुलीला जन्म दिला होता आणि परतीचा प्रवास ही त्या मातेनी आपल्या नवजात बाळाला घेऊन एका छोट्या लाकडी नावेतून केला होता. परत घनदाट जंगलातून पायवाट करत ती आपल्या गावी पोहोचली होती.
भामरागड तालुक्यातील गुंडेनूर गावातील अशाच एका गरोदर महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने चार महिन्याच्या गरोदर महिलेचा मृत्यू झाला होता. त्या महिलेला नदी नाले ओलांडून 10 किलोमीटर खाटेवर पायवाट करत दवाखान्यात आणावं लागलं होतं.
याव्यतिरिक्त शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका असे कोणत्याही अधिकारी-कर्मचारी यांना सुद्धा नाल्यातूनच गावात जावं लागत असे. ग्रामपंचायत सचिव अविनाश गोरे यांनी 15 ऑक्टोबर रोजी गावात सभा घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. या सभेत महिलांनी देखील सहभाग घेऊन काहीही करून रस्ता तयार करावा असे निर्णय घेतले. तात्पुरत्या पुलाचे बांधकाम करण्याचे उपाय शोधले. गावात बांबू मुबलक प्रमाणात असल्याने लोकसहभागातून बांबूचा पूल तयार करण्याची संकल्पना मांडली. सर्वानुमते बांबू पूल तयार करण्याचं ठरविलं. याकरीता लागणारे सर्व साहित्य जमा करून मोटार सायकल जाऊ शकेल अशा प्रकारच्या बांबू पुलाचे बांधकाम करण्यात आले. या कामाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक करण्यात येत असून यामुळे काही काळाकरीता का होईना पण जाण्या-येण्या करीता मार्ग तयार झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- धक्कादायक... गडचिरोलीत जंगलात झाडाखाली गरोदर मातेची प्रसूती, आरोग्यसेविकेमुळे वाचले प्राण
- गडचिरोलीत उपचाराअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू; सहा किलोमीटर खाटेवरुन रुग्णालयात घेतली होती धाव
- धक्कादायक... प्रसूतीसाठी 23 किमीची पायपीट केलेल्या महिलेला प्रसूतीनंतरही पायपीट करण्याची वेळ