मुंबई : एसटी कामगारांचे वेतन आणि अन्य देणी देण्यासाठी एसटी महामंडळाने 2 हजार कोटींचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एसटीचे काही आगार, बस स्थानक तारण ठेवण्यात येणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत. तसेच एसटी महामंडळाला इतर देणीही द्यायची आहेत. त्यासाठी हे कर्ज काढण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे.


एसटी महामंडळाने आधीच्या सरकारच्या काळात घेतलेलं 1700 कोटींचं कर्ज तब्बल 5 हजार कोटींवर जाऊन पोहोचलं होतं. अशातच कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे सगळं आर्थिकचक्र ठप्प झाली होती. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही राज्य सरकारला निधी द्यावा लागला होता. परंतु, सध्या राज्य सरकारलाही अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारच्या डोक्यावर 6 लाख कोटींच्या आसपास कर्जाचा भार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव, त्यानंतर आलेली नैसर्गिक संकटं यांमुळेही राज्याच्या तिजोरीवर ताण पडला आहे. त्यामुळे स्वतःच कर्जाची उभारणी करावी या दृष्टीने एसटी महामंडळाने प्रयत्न सुरु केले आहेत.


पाहा व्हिडीओ : एसटी महामंडळ काढणार 2 हजार कोटींचं कर्ज, काही बसस्थानकं तारण ठेवणार



सध्या एसटी महामंडळाकडे दोन पर्याय आहेत. एक राज्य सरकारचा निधी आणि दुसरा म्हणजे, बँकेचं कर्ज. राज्या सरकार आधीपासूनच अडचणीत असल्यामुळे आता एसटी महामंडळासमोर बँकेचं कर्ज हाच एक पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे या पर्यायावर एसटी महामंडळाकडून विचार सुरु आहे. एसटी महामंडळाकडे स्वतःची 250 आगार आणि 609 बस स्थानकं आहेत. त्यामुळे कर्ज काढण्यासाठी त्यापैकी काही बस स्थानकं आणि आगारं तारण ठेवून 2 हजार 300 कोटी रुपयांचं कर्ज काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळचा मोठा निर्णय, यंदा दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द