गडचिरोली: घनदाट जंगल आणि त्यात नाल्यावर पाणी जायला नीट रस्ता नाही वाटेत पूर अशात एका आदिवासी महिलेची भर जंगलात झाडाखाली प्रसूती झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात घडली. एटापल्ली तालुक्यातील गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र गट्टाच्या झारेवाडा गावातील आदिवासी महिला भारती दोरपेटी या महिलेच्या पोटात दुखणे सुरू झाले. यानंतर येथील आशा सेविकेने गट्टा आरोग्य उपकेंद्रात माहिती दिली. उपकेंद्रातील आरोग्य सेविका सोनी दुर्गे यांनी तात्काळ रुग्णवाहिका घेऊन गरोदर मातेला आणण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यात पडणाऱ्या गिलनगुडा या नाल्यावरून पुराचं पाणी वाहत होते. अशात रूग्णवाहिका काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र नाल्यावर एक मालवाहू ट्रक फसला होता. त्यामुळे रुग्णवाहिका झारेवाडा गावाच्या जवळ नेणे ही शक्य नव्हते. झारेवाडा गावात जाण्यासाठी कोणताच रस्ता नाही. घनदाट जंगलातून पायवाट काढत त्या गावी जावे लागते. त्यामुळे गरोदर मातेला खाटेवर घेऊन घनदाट जंगलातून मुख्य रस्त्याकडे निघाले होते.

रूग्णवाहिका जाऊ शकत नाही ही बाब आरोग्यसेविका सोनी दुर्गे यांच्या लक्षात आली आणि तिकडे गरोदर माता भारतीला प्रसूती कळा येणे सुरू झाले होते. अशात भारतीला रुग्णालयात न्यायचे कसे? असा प्रश्न आरोग्य सेविका सोनी दुर्गे यांना सतावत होता. तात्काळ निर्णय घेऊन सोनी दुर्गे यांनी प्रसूतीला लागणाऱ्या आपल्या साहित्यासह ते गरोदर भारतीला जिथे घनदाट जंगलातील पायवाट रस्त्यातून आणले होते ते स्थळ गाठले व जंगलातच तिच्या प्रसूतीची तयारी सुरू केली. काही वेळात आरोग्यसेविका सोनी दुर्गे यांच्या अथक प्रयत्नाने आदिवासी  भारतीची प्रसूती झाली आणि भारतीने कन्येस जन्म दिला. नवजात बाळाचे वजन दोन किलो सातशे ग्राम असून पुढील उपचारासाठी दोघांनाही गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

धक्कादायक... प्रसूतीसाठी 23 किमीची पायपीट केलेल्या महिलेला प्रसूतीनंतरही पायपीट करण्याची वेळ

कंत्राटी आरोग्य सेविका सोनी दुर्गे आणि आशा सेविका सविता आलाम यांनी वेळीच धावपळ नसती केली तर बाळाच्या आणि भारतीच्या जीवास धोका निर्माण झाला असता. परिस्थितीवर मात करून ही आदिवासी महिलेची प्रसूती करून आरोग्य सेविका सोनी दुर्गे यांनी इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

मागील महिन्यात भामरागड तालुक्यात अशीच घटना घडली होती. एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी तब्बल 23 किलोमीटर घनदाट जंगलातून नदी नाल्यांच्या पाण्याच्या प्रवाहातून पायपीट करत रुग्णालय गाठावं लागलं होतं तर दुसरी घटना त्याच भागात घडली होती ज्यात एका गरोदर मातेला वेळेत उपचार न मिळाल्याने वाटेतच प्राण गमवावे लागले होते. एबीपी माझाने सतत याकडे शासनच लक्ष वेधलं होतं. ही उदाहरणे ताजी असताना परत अशीच घटना घडली आहे.