औरंगाबाद/उस्मानाबाद : अवैधरित्या उंटांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी उस्मानाबादजवळ जप्त केलाय. या ट्रकमध्ये 14 उंट होते, राजस्थानमधून आणलेल्या उंटांपैकी दोन उंटांचा प्रवासातच मृत्यू झाला. तर उर्वरित उंट हैदराबादला कत्तलखान्यात नेण्यात येत होते, अशी माहिती आहे.

राजस्थानहून आणलेले हे उंट हैदराबादला कत्तलखान्यात नेण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून उस्मानाबादजवळ ट्रक अडवला. पोलिसांनी अडवलेल्या या ट्रकमध्ये 14 उंट होते. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार दोन गाड्यांमध्ये 27 उंट होते. यातील एक गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यातील 14 उंटांपैकी दोन उंटांचा वाहतुकीदरम्यान मृत्यू झाला आहे. तर तीन उंट गंभीर जखमी आहेत.

विश्व हिंदू परिषदेला याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्याचं त्यांनी सांगितलंय. पोलिसांकडून आता दुसऱ्या ट्रकचा शोध घेतला जात आहे. उंटांची अशा पद्धतीने अवैध वाहतूक करण्यात येत असल्याने यामागे एखादं मोठं रॅकेट आहे का, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.