Bhiwandi Crime News : अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई गुरफटत असतानाचा भिवंडी (Bhiwandi) शहरात ही त्याचा वापर वाढू लागला आहे. भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून तब्बल 21 लाख 20 हजार रुपये किमतीचा 106 ग्रॅम एमडी आणि 15 लाखांची बी एम डबल्यू कारसह एक पिस्टल असा एकूण 37 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हेगारी कारवायांमुळे शहरातील हद्दपार केलेला मोहम्मद अली अब्दुल अजीज शेख हा शहरात एम डी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने त्यास शांतीनगर परिसरातून 11 लाख 20 हजार रुपये किमतीचा 56 ग्रॅम एमडी जप्त केलाय.


मोबाइलमधील व्हिडिओमुळे फुटलं बिंग 


त्याच वेळी तपासात नाशिक येथील दोन जण एमडी घेऊन येणारा असल्याची माहिती मिळाल्यावर साईबाबा मंदिर परिसरात पोलिसांनी सापळा रचून संशयित बी एम डबल्यु कार मधील दोघा जणांची झडती घेतली असता, त्यांच्या जवळ 10 लाख रुपये किमतीचा 50 ग्रॅम एमडी आढळून आला. मुज्जफर मोबिन शेख आणि समीर फिरोज रोकडीया असे दोघे (रा.नाशिक रोड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील मोबाईल ताब्यात घेऊन तपासले असता त्या मध्ये हातात पिस्टल घेऊन वावरत असतानाचा व्हिडिओ आढळून आलाय. त्यानुसार पोलिसांनी नाशिक रोड येथील त्याच्या घरातुन पिस्टल जप्त केली आहे. या दोन्ही प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


डिझेल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा जणांना अटक


तर अशीच एक आणखी कारवाई पोलिसांनी भिवंडीत केली आहे. यात भिवंडी शहरात टँकर घेऊन डिझेल विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघा जणांना शांतीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केलीय. त्यांच्या जवळून टँकर आणि 15 हजार लिटर डिझेल असा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.


भिवंडी कल्याण रस्त्यावरील साईबाबा मंदिर हिना गॅरेजच्या समोरील रस्त्यावर दोन व्यक्ती अवैध डिझेलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त बातमी शांतिनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने घटनास्थळी सापळा कारवाई केली. यात अजित चोविसलाल यादव,(वय 34 रा.बेलापूर नवी मुंबई) आणि  चालक आरीफ जलालुदीन खान (वय 42 रा.मानखुर्द, मुंबई) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या जवळ टँकर मधील डिझेल बाबत कोणतीही कागदपत्रे आढळून न आल्याने त्यांनी हे डिझेल विक्रीसाठी घेऊन आल्याचे निष्पन्न झाल्याने शांतीनगर पोलिसांनी 10 लाख 80 हजार रुपये किमतीचे 15 हजार 500 लिटर डिझेल आणि 10 लाख रुपयांचा टँकर, असा एकूण 20 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती विनायक गायकवाड यांनी दिली आहे.


हे ही वाचा