Nagpur News नागपूर : राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सध्या सगळीकडे चर्चा आहे. या योजनेसाठी आजघडीला कोट्यवधी महिलांनी अर्ज केलेले असून त्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यावर सरकारने पैसे पाठवण्यास सुरुवातही केलेली आहे. तर 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये दिले जातील. दरम्यान, काही महिलांच्या अर्जात काही त्रुटी असल्यामुळे ते नामंजूर करण्यात आले आहेत. अशा महिलांना आता सरकारने आणखी एक संधी दिली आहे.
राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी महत्वाकांशी योजना ठरल्याचा दावा करणाऱ्या सरकारवर विरोधकांनी मात्र या योजनेवरुन टीकेची झोड उठवली आहे. अशातच आता नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या काटोल विधानसभा क्षेत्रात भाजपकडून लावण्यात आलेले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बॅनर काही अज्ञातांनी फाडले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य समीर उमप यांनी पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कृत्य, भाजपचा आरोप
नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा क्षेत्रात जिल्हा परिषद सदस्य समीर उमप यांनी काटोल, नरखेड परिसरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बॅनर लावले होते. यावर सरकारचे आभार मानणारा संदेश लिहला असून समीर उमप यांचा फोटोही त्यावर होता. मात्र विरोधकांनी हे बॅनर रात्रीच्या सुमारास फडले असल्याचा आरोप उमप यांनी केला आहे. हे कृत्य राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशाराही समीर उमप यांनी लेखी तक्रारीमध्ये दिला आहे. त्यामुळे बॅनरवरुन दोन गट आमन-सामने आल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.
सप्टेंबर महिन्यात उर्वरित पात्र महिलांना मिळणार लाभ
आतापर्यंत कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे 3000 रुपये आले आहेत. 31 जुलैपर्यंत फॉर्म भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना हे 3000 रुपये देण्यात आले आहेत. आता 31 जुलैनंतर आलेल्या फॉर्मची छाननी चालू आहे. सप्टेंबर महिन्यात उर्वरित पात्र महिलांना एकूण तीन महिन्यांचे पैसे दिले जातील. म्हणजेच पात्र महिलांना तीन महिन्यांचे 4500 रुपये मिळतील.
पैसे जमा न झाल्यास कुठे कराल तक्रार?
लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना महिलांना अनेक अडचणी येत आहेत. काही महिलांचे अर्ज मंजूर होताना अडचणी येत आहेत. अशा अडचणी येत असतील तर महिलांनी कुठे तक्रार करावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर काही अडचणी येत असतील तर त्या नारी शक्तीदूत अॅपवर त्याबाबत तक्रार करू शकतात. यासह महिला स्थानिक अंगणवाडी केंद्रावर जाऊन अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून त्यांची अडचण सरकारदरबारी मांडू शकतात. दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत केली जात आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळाले आहेत.
महत्वाच्या बातम्या: