जालना : आयएएस अधिकारी अभिमन्यू काळे यांची जिल्हाधिकारीपदी झालेली नियुक्ती तासाभरातच रद्द झाली. गेल्या दोन महिन्यापासून रिक्त असलेल्या जालन्याच्या जिल्हाधिकारी पदावर अभिमन्यू काळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु ही नियुक्ती तासाभरापुरतीच मर्यादित राहिली.

बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तासाभरातच अभिमन्यू काळे यांना आपला गाशा गुंडाळून परत जावं लागलं.

जालन्याच्या जिल्हाधिकारी पदावर गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार काळे यांनी रुजू होऊन पदभारही स्वीकारला. मात्र तासाभरातच काळे यांना रुजू न होण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अभिमन्यू काळे रात्रीच माघारी परतले.

अभिमन्यू काळेंचं प्रकरण काय होतं?

अभिमन्यू काळे हे गोंदियाचे जिल्हाधिकारी असताना, नुकत्याच झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत गैरप्रकारामुळे 49 ठिकाणी फेरमतदान झालं होतं. या गैरप्रकाराचा ठपका ठेवून निवडणूक आयोगाने काळे यांना पाच वर्षांसाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यावर बंदी घातली आहे.

तसंच त्यांना निवडणूक आयोगाच्या आदेशावरुन सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. मात्र एखाद्या अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवलं असताना, त्याची इतरत्र नेमणूक करताना चूक झाल्याची चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या

गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

अधिकाऱ्यांनी वेड्यात काढलं, पण गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळाचं चक्रव्यूह भेदलं!

गोंदियात झाडाची प्लास्टिक सर्जरी, राज्यात पहिलाच प्रयोग