मुंबई : भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रावसाहेब दानवे हे मातोश्रीवर गेले नाहीत. शिवसेना मंत्री अर्जुन खोतकरांनी केलेल्या तक्रारीमुळे दानवेंना मातोश्रीवर नेलं नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एबीपी माझाने याबाबत रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर या दोघांशीही बातचीत केली. रावसाहेब दानवे जालन्याचे खासदार आहेत, तर अर्जुन खोतकरही जालन्याचेच आहेत. स्थानिक राजकारणावरुन एबीपी माझावरील चर्चेदरम्यान दोघांची चांगलीच जुंपली.

विशेष म्हणजे दोघांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले. खासदार संजय राऊत यांच्याकडे आपण दानवेंची तक्रार केली असल्याची माहिती यावेळी अर्जुन खोतकरांनी दिली. त्यामुळे याच तक्रारीमुळे रावसाहेब दानवेंना मातोश्रीवर नेणं पक्षाने टाळलं का, अशी चर्चा आहे.

अमित शाह यांनी सपत्निक सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं आणि मग ते पुढे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गेले. मात्र सिद्धीविनायकाच्या दर्शनानंतरच दानवे माघारी परतले, ते मातोश्रीवर गेले नाहीत. आशिष शेलार यांच्या घरी गेल्यानंतर अमित शाह मुख्यमंत्र्यांसोबत मातोश्रीवर गेले.

दरम्यान, आमचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वीच ठरलेला आहे, माझा दुसरा कार्यक्रम होता, आता सह्याद्री अतिथी गृहावर बैठका आहोत, त्यामुळे इकडे यावं लागलं, अशी माहिती दानवेंनी दिली.


व्हिडीओ :