आज दुपारी शरद पवार मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयात जाणार होते. पवार यांनी तशी तयारीदेखील केली होती. परंतु त्याअगोदरच ईडीने पवार यांना एक ईमेल धाडला. या ईमेलमध्ये म्हटले आहे की, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी तुमच्या चौकशीची गरज नाही, कदाचित भविष्यातही या चौकशीची गरज पडणार नाही.
ईडीच्या या ईमेलनंतर आणि पोलिसांनी केलेल्या मनधरणीनंतर शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले , 24 तारखेला मी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, मी इडी कार्यालयात जाईन. ज्या बँकांच्या कधी पॅनलवरही मी नव्हतो, अशा सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी संचालकांसोबत माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पवार म्हणाले की, ईडीच्या अधिकाऱ्यांना मी योग्य ते सहकार्य करेन. आत्ताच मी अधिकाऱ्यांना भेटून घेईन, जेणेकरून पुढील महिनाभर निवडणुकांसाठी प्रचार करू शकेन. पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त यांनी मला विनंती केली की, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शहरामध्ये आंदोलनाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मी स्वतः राज्यात गृहखात्याची परिस्थिती सांभाळली आहे. त्यामुळे मी त्यांचे म्हणणे समजू शकतो. माझ्या एखाद्या निर्णयानं सामान्य माणसाला त्रास होऊ नये. म्हणून तूर्तास मी ईडी कार्यालयात जाणार नाही.
पवार म्हणाले की, मी सर्व कार्यकर्ते आणि मला पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानतो. राहुल गांधींनी मला फोन करुन मला पाठिंबा दिला, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील पाठिंबा दिला, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आता मी पुणे जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी जाणार आहे.
ईडीच्या या ईमेलनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यभरातले कार्यकर्ते जल्लोष साजरा करु लागले आहेत. दरम्यान ईडी कोणाच्या इशाऱ्यावर चालतं? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी पवार म्हणाले होते की,"मी कधीच कुठल्याही सहकरी बँकेचा संचालक नव्हतो, मात्र माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी स्वागत करतो",सध्या सुरू असलेल्या आपल्या दौऱ्यांमुळे धास्तावून सरकारनं ही कारवाई केली, असा आरोपही त्यांनी केला होता.
पाहा काय म्हणाले शरद पवार