मुंबई : कर्जमाफीच्या अंमलबजावणीत झालेल्या घोळावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा बालिश मुख्यमंत्री यापूर्वी कधीही पाहिला नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला.


‘फर्स्टपोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी हे वक्तव्य केलं. कर्जमाफीमुळे राष्ट्रावादीच्या ताब्यात असलेल्या सहकारी बँकांना फायदा होईल, असा मुख्यमंत्र्यांचा समज असल्याची टीकाही पवारांनी केली.

फडणवीसांना त्यांच्या स्वतःच्या खात्यांवर आणि प्रशासकांवर विश्वास आहे. त्यांनी अधिकाऱ्यांची एक अशी फळी तयार केली आहे, जी राज्यासाठी नाही, तर मुख्यमंत्र्यांसाठी काम करते. असा बालिश मुख्यमंत्री यापूर्वी महाराष्ट्रात कधीही पाहिला नाही, अशी जहरी टीका पवारांनी केली.

मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमच्या व्यवस्थेवर, बँक अधिकाऱ्यांवर विश्वास असावा लागतो. मात्र दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे फॉर्म ऑनलाईन भरण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांना कागदपत्र मिरवावे लागले. ग्रामीण भागात 8 तासांपेक्षा जास्त भारनियमन आहे. वीजच नसेल तर शेतकरी फॉर्म कसा भरणार? ही नसती उठाठेव आहे, अशी टीका पवारांनी केली.

दरम्यान गेल्यावेळी कर्जमाफी झाली तेव्हा घोटाळा झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केल्याचं ऐकायला मिळालं. हे आरोप धादांत खोटे आहेत. मुख्यमंत्र्यांकडे चौकशीचे अधिकार आहेत, त्यांनी चौकशी करावी आणि सत्य समोर आणावं, असं आव्हान पवारांनी दिलं.