कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोणतीही शिक्षा भोगीन, असं खुलं आव्हान ग्रामविकास मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्धी सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिलं. शेतकरी कर्जवाटपासंदर्भात भाजपने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा कोल्हापूर जिल्ह्यात पुरता फज्जा उडाल्याची टीकाही हसन मुश्रीफ यांनी केली.

Continues below advertisement


हसन मुश्रीफ यांनी पत्रक काढून भाजपवर टीका केली. या पत्रकात म्हटलं आहे की, "चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना झालेल्या पीक कर्ज वाटपाची वस्तुनिष्ठ माहिती आधी घ्यायला हवी होती. ही माहिती घेऊन कोल्हापूरऐवजी राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिथे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झालेली नाही, तिथे हे आंदोलन करायला हवे होते. भाजपने राज्यभरातील बँकांसमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, पण कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावरुनच त्यांच्यावर ओढलेली नामुष्की आणि कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांच्या आंदोलनाची हवाच गेल्याचं स्पष्ट होतं. केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकाही शेतकऱ्यांना कर्ज देत आहेत."


जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा समन्वय समितीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2020-21 या कृषी हंगामासाठी एकूण खरीप 686 कोटी दिलेले आहेत. प्रत्यक्षात केडीडीसी बँकेने 1082 कोटी रुपये पीक कर्ज वाटप केलं आहे. ही टक्केवारी सरकारने दिलेल्या उद्दिष्टाच्या 158 टक्के आहे. पीककर्ज वाटपात केडीसीसी बँक राज्यात अव्वल असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. तसंच महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीचे पैसे न येऊनही शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे.