मुंबई : अंनिसचे समन्वयक श्याम मानव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरीव 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणावरुन आता चांगलच राजकारण तापलं आहे. न्यायमुर्ती चांदीवाल चौकशी अहवाल हा महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) कार्यकाळात आला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. आता, त्यावरुन अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना थेट माजी पोलीस महासंचालक परमबीरसिंह (Param bir singh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता, अनिल देशमुख यांनी केलेले आरोप फेटाळत, देशमुख यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, अशा शब्दात परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्र्यांवर पलटवार केला आहे. त्यामुळे, राज्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणावरुन राजकीय वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अँटिलिया जिलेटीन कांड्या प्रकरणात परमबीर सिंह यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत डील झाली आहे, ते गुप्तपणे भेटत होते, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. आता, या आरोपावर परमबीर सिंह यांनी एबीपी माझाशी संवाद साधत आरोप फेटाळले आहेत. तसेच, याप्रकरणी माझी प्रथम एटीएस चौकशी झाली, मग एनआयएने केली, मी चौकशीला सामोरा गेलो, पण तपासात काहीच आलं नाही. माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत, पुरावे असतील तर ते आणून द्यावेत. अन्यथा, मी बाकीचे कांड बाहेर काढेन, असा इशाराच परमबीर सिंह यांनी दिला आहे. तसेच, आता जे समोर आलंय ते 10 टक्के आहे. बाकी पोलीस अधिकारी ज्यांना अनिल देशमुख यांनी सतावलं त्यांनी समोर येण्याची हिंमत केली नाही. सलील देशमुख, अनिल देशमुख, संजय पांडे आणि माझी एकाच दिवशी नार्को टेस्ट करा, मी नार्को टेस्टसाठी तयार आहे, असे परमबीर सिंह यांन म्हटले. आपण नार्को टेस्टचं आव्हान स्वीकारतो आणि एकाच दिवशी आमची सर्वांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणीही सिंह यांनी केली.
देशमुखांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज
मी जर गुप्तपणे देवेंद्र फडणवीस यांना भेटत असेल, त्यांच्यासोबत डील करत असेल तर तुम्ही तेव्हा सरकारमध्ये होतात, मग तुमच्याकडे काही पुरावे असतील ते समोर आणावे, असे आव्हानही परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्या आरोपावर उत्तर देताना म्हटले. या आरोपांवपर मी आता वकिलांचा सल्ला घेऊन, कायदेशीर कारवाई करणार आहे. पण, मला अशा प्रकारच्या तू तू मै मै मध्ये अजिबात रस नाही, असेही परमबीर सिंह यांनी स्पष्ट केले. तसेच, अनिल देशमुख अशा प्रकारचं राजकारण का करत आहेत, ते कशामुळे असे आरोप करत आहेत, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय का, याची उत्तरे मानस विकार तज्ज्ञच देतील, असेही सिंह यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.
अनिल देशमुखांचे परमबीर सिंहांवर गंभीर आरोप
मी गृहमंत्री असताना मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यानंतर गाडी मालकाची हत्या झाली. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंह जे तेव्हाचे मुंबई पोलिसांचे आयुक्त होते, तेच या प्रकरणाचे मास्टरमाईंड होते. त्यांना NIA मार्फत अटक होणार होती. त्यावेळेस फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात बोलणं झालं आणि तेव्हा परमबीर सिंह फडणवीस यांना शरण गेले. तेव्हा फडणवीसांनी परमबीर सिंह यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आणि त्यांना माझ्यावर आरोप करायला लावले. परिणामी, फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात डील झाली होती आणि त्यानुसारच परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप लावले. असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला आहे.
चांदीवाल अहवालावर अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण
चांदीवाल चौकशी अहवाल आला, पण काही दिवसातच आमचं सरकार कोसळलं. त्याला जबाबदार देखील भाजपच होता. त्यामुळे चांदीवाल चौकशी अहवाल आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही, असे अनिल देशमुख यांनी म्हटले. तसेच, गेले दोन वर्ष हाच चांदीवाल आयोगाचा अहवाल त्यांच्या सरकारकडे पडून होता. 11 महिने चौकशी आणि चौदाशे पानांचा रिपोर्ट महायुती सरकारनं जाहीर करावा, अशी माझी मागणी होती. त्यासाठी अनेकदा मी त्या आशयाचे पत्र देखील पाठवले.