मुंबई : कोरोना संकटाच्यादृष्टीनं देशात पुढचे 100 दिवस अत्यंत महत्वाचे आहे. कोरोनाच्या तियस-या लाटेला रोखण्याकरता पुढचे 100 ते 125 दिवस खबरदारी घेणं गरजेचं आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलंय. देशाची कोरोनाविषयक चिंता वाढवणा-या सहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यामुळे इथुन पुढे सर्वच यंत्रणांकरता मिशन 100 डेज महत्वाचं आहे. 


महाराष्ट्र, केरळ, ओडिशा, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश या सहा राज्यांमधील पुढचे शंभर दिवस कसे असतील याकडे अख्ख्या देशाचं लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना आढावा बैठकीत या सहा राज्यांमधल्या रुग्णसंख्या वाढीविषयी चिंता व्यक्त केली आहे. पुढच्या 100  दिवसांत या सहा राज्यांनी कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवली तर देशासमोरचं तिस-या लाटेचं संकट टळू शकेल. 


जशी देशाची काळजी महाराष्ट्र आणि दक्षिणेतल्या 5 राज्यांनी वाढवलीय,  तसंच महाराष्ट्रालाही 8 जिल्ह्यांनी  चिंतेत टाकलंय. या 8 जिल्ह्यांचा  कमी न होणा-या पॉझिटीव्हीटी रेट धडकी भरवणारा आहे.



  •  रत्नागिरी (13.07%)

  • कोल्हापूर (9.85%)

  • सांगली (10.62%)

  • सातारा (8.23%)

  • पुणे (7.74%)

  • रायगड (6.98%)

  • सिंधुदूर्ग (5.94%)

  • औरंगाबाद (5.10%)

  • बीड (4.64%)


हे आठ जिल्हे आणि तिथली स्थिती म्हणजे महाराष्ट्रातल्या तिस-या लाटेच्या धोक्याची घंटाच आहेत. त्यामुळे मोठं संकट टाळायचं असेल तर आत्ताच यंत्रणांनी कंबर कसुन तयार रहायला हवे. 



तिस-या लाटेला रोखण्यासाठी  महाराष्ट्राचं मिशन 100 डेज कसं असेल?? 


पॉझिटीव्हटी रेट आणि रिक्त बेडस् च्या आधारावर जिल्ह्यांमधील निर्बंधांचे निकष राज्य सरकारनं ठरवले आहेत. मुंबईसारखी महानगरे आणि सध्या पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणारे  8 जिल्हे येथे बारकाईनं लक्ष आहे. रुग्णखाटांची संख्या वाढवण्यासाठी मुंबईत पाच नव्या कोविड सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. तिस-या लाटेचा लहान मुलांना होणारा धोका लक्षात घेता राज्यात चाईल्ड टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी विशेष पेडियाट्रिक कोविड वॉर्डची निर्मीती केली आहे. दुस-या लाटेतील ऑक्सिजन कमतरतेचं संकट लक्षात घेऊन नव्या ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली आहे. मुंबईला ऑक्सिजन निर्मितीच्या दृष्टीनं स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणा-या पाच प्लांटची निर्मिती केली आहे. 


ठाकरे सरकारनं केंद्रापुढे तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी काही मागण्याही ठेवल्या आहेत. राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना होणारी गर्दी पहाता केंद्रानंच याबाबत मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात. कोविड रुग्णांवर उपचार करण्याकरता मोनोक्लोनल अॅटीबॉडी ट्रिटमेंटची किंमत नियंत्रीत, सर्वसामान्यांना परवडू शकेल अशी असावी. तिस-या लाटेचा सामना करण्याकरता महाराष्च्राला दररोज दोन हजार मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज भासेल त्याकरता मदत करावी. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि विशेषत: पॉझिटीव्हिटी रेट जास्त असलेल्या 10 जिल्ह्यांसाठी वेगवान लसपुरवठा व्हावा.


 सध्या  दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलँडमध्ये कोरोना रुग्णसंख्येच वाढ होताना दिसून येत आहे.  तुलनेनं भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी  रुग्णघटीचा वेग मात्र  कमी झालाय. त्यामुळे भारतावरही तिसऱ्या लाटेच्या संकटाची टांगती तलवार आहे.