Majha Katta: सोशीत आणि वंचितांसाठी लढा देणारी संघटना म्हणजे 'दलित पँथर'. धर्म, वर्ण-विरहित, शोषणमुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत आणि विज्ञानी उद्दिष्ट समोर ठेवून या संघटनेने काम केलं आहे. दलित पँथर हा लढा नेमका कसा उभा राहिला, याबाबत ज्येष्ठ विचारवंत कवी, कथाकार, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन डांगळे यांनी 'माझा कट्ट्या'वर हजेरी लावत माहिती सांगितली आहे. डांगळे हे दलित पँथरचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. माझा कट्टा (Majha Katta) या एबीपी माझाच्या (ABP) विशेष कार्यक्रमात बोलताना दलित पँथर बद्दल माहित देताना त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात 70 च्या दशकात दलितांवरील अन्याय वाढले होते. त्यावेळी दलित साहित्याची चळवळ सुरू झाली होती. आम्हीही सर्व लिहते होतो. कोणी कविता लिहीत होता, तर कोणी लेख. अमेरिकेतील ब्लॅक पँथरची स्थापना करणारी मंडळी पाहिली तर तेही सर्व लेखक होते. त्यावेळी आम्हाला सर्वाना वाटले, नुसते कथा, कविता आणि लेख लिहून भागणार नाही. तेव्हा आम्ही देखील दलित साहित्यापासून दलित शब्द आणि पँथरपासून 'दलित पँथर' संघटना सुरू केली.''
9 जुलै रोजी झाली स्थापना
दलित पँथरच्या स्थापनेबाबत माहिती देताना अर्जुन डांगळे म्हणाले, नामदेव ढसाळ, कोंडीबा खरात, उमाकांत असे बरेच साहित्यिक आम्ही लिहीत होतो. त्यावेळी आम्ही 9 जुलै 1972 रोजी मुंबईतील कामाठीपुरा येथे दलित पँथरचा पहिला मेळावा घेतला. याची स्थापना आधीच झाली होती. मात्र याचा पहिला मेळावा असल्याने आम्ही दलित पँथरचा 9 जुलै हा स्थापना दिन म्हणून निश्चित केला.
जिथे अन्याय होईल तिथे दलित पँथर जायची
अर्जुन डांगळे म्हणाले की, जिथे अन्याय होत होता तिथे दलित पँथरचे कार्यकर्ते जात होते. अनेक ठिकाणी जिथे जमिनी बळकावल्या जात होत्या, जिथे अन्याय अत्याचार होत होते, त्यावेळी तिथे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पँथर कार्यकर्त्यांनी लढे दिले आहेत.
रिपब्लिकन चळवळीची फाटाफूट झाली, डाव्या चळवळीत अनेक संघटना उदयास आल्या
डांगळे यांनी सांगितलं, त्याकाळी रिपब्लिकन चळवळीची फाटाफूट झाली होती. त्यात विविध गट पडले होते. त्यानंतर 1967 साली काँग्रेस-रिपब्लिकन समजवता झाला. त्यामुळे समाजात काँग्रेससोबत जाण्याची प्रवृत्ती वाढली. याने लढा देण्यासाठी कोणी उरलंच नाही. त्यावेळी 70 च्या दशकात आमच्या सोबतच अनेक डाव्या चळवळीतील संघटना उभ्या राहिल्या. यात युक्रांत, युवा क्रांती दल आणि स्टूडेंट फेडरेशन ऑफ इंडिया सारख्या संघटनांचा समावेश आहे. एकीकडे नक्षलवादी चळवळ देखील सुरू झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. 70 चं दक्षक हे प्रबोधनाचं असल्याचंही ते म्हणाले आहेत.
यामुळे दलित पँथरमध्ये पडली फाटाफूट
अर्जुन डांगळे म्हणाले, त्यावेळी दलित पँथरचे दोन मोठे नेते म्हणजे नामदेव ढसाळ आणि राजा ढाले. हे दोघेही भिन्न प्रवृत्तीचे होते. नामदेव ढसाळ यांना प्रजा समाजवादी पक्षाचा अनुभव होता. मात्र राजा ढाले यांना चळवळीची परंपरा नव्हती. ते दलित साहित्याच्या माध्यमातून आले होते. त्यावेळी वरळी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होती. तिथे त्यावेळी रामराव अधिक उभे राहिले होते. त्यावेळी गिरणी कामगारांचा संप सुरू होता. कॉम्रेड डांगे या संपाचं नेतृत्व करत होते. त्यावेळी संप सुरू असताना निवडणूक संदर्भात नामदेव, राजा ढाले आणि आमचे मतभेद झाले. त्यावेळी काँग्रेसला साथ देणं आणि रामराव अधिक यांना पाठिंबा दिल्यामुळे दलित पँथरमध्ये फाटाफुटीला सुरुवात झाली.