Majha Katta: ज्येष्ठ विचारवंत कवी, कथाकार, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन डांगळे यांनी 'माझा कट्ट्या'वर हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. यावेळी त्यांनी दलित साहित्य, आंबेडकरी चळवळ आणि दलित पँथरचा जन्म कसा झाला? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. माझा कट्टा (Majha Katta) या एबीपी माझाच्या (ABP) विशेष कार्यक्रमात बोलताना दलित पँथर बद्दल त्यांनी सांगितले की, ''दलित पँथरने महाराष्ट्रालाच नाही तर देशाला एक वळण दिलं आहे. बाबासाहेबांनी पहिल्यांदा सत्याग्रह केला, तो रायगड येथे चवदार तळ्याचा. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून हे सत्याग्रह केलं. अशा या महाराष्ट्रातच दलित पँथर वाढली, याचे कारण म्हणजे आम्हाला लहानपणापासून हे बाळकडू मिळालं आहे. महाराष्ट्रात 70 च्या दशकात दलितांवरील अन्याय वाढले होते. त्यावेळी दलित साहित्याची चळवळ सुरू झाली होती. आम्हीही सर्व लिहते होतो. कोणी कविता लिहीत होता, तर कोणी लेख. अमेरिकेतील ब्लॅक पँथरची स्थापना करणारी मंडळी पाहिली तर तेही सर्व लेखक होते. त्यावेळी आम्हाला सर्वाना वाटले, नुसते कथा, कविता आणि लेख लिहून भागणार नाही. तेव्हा आम्ही देखील दलित साहित्यापासून दलित शब्द आणि पँथरपासून 'दलित पँथर' संघटना सुरू केली.''


'मी टॅक्सी ड्रायव्हर आहे', नामदेव ढसाळांचा सांगितला 'तो' किस्सा  


दिवंगत कवी नामदेव ढसाळ यांची आठवण काढत अर्जुन डांगळे यांनी त्यांचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, प्रगत साहित्य सभा होती. त्यात सर्व डाव्या चळवळीतील लोक, आंबेडकरवादी, परिवर्तनवादी लोक आली होती. यात पु.ल.देशपांडे हे देखील आले होते. त्यावेळी 70 च्या दशकात भिवंडी येथे धार्मिक दंगल झाली होती. त्या निमित्ताने दंगलग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी ही सभा भरवण्यात आली होती. त्यावेळी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे कविता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होत. अनंत काणेकर त्यावेळी अध्यक्ष होते. या संमेलनात विंदा करंदीकर, पाडगावकर असे सर्व दिग्गज कवी आले होते. त्यावेळी कार्यक्रम संपत असताना एक चिठ्ठी आली. त्यात लिहिलं होत की, 'मी टॅक्सी ड्रायव्हर आहे, मला कविता वाचायची आहे.' त्यावेळी काणेकर म्हणाले वेळ संपत आली आहे. तेव्हा मी म्हटलं, वाचू द्या तो टॅक्स ड्रायव्हर आहे. मी म्हणालो तर माझ्यासोबत इतर विद्यार्थ्यांनीही आवाज उठवला. मग त्यांना कविता वाचून देण्यात आली.


ते पुढे म्हणाले, ''त्यानंतर डायव्हरच्या पांढऱ्या कळकट वेषातल्या, कुरळ्या केसाचा आणि सावळ्या रंगाचा कवी तिथे आला. त्याने तीन कविता वाचल्या, त्या तीन कविता म्हणजे मराठी साहित्याचे वळण बदलावणाऱ्या होत्या. त्याच नाव होत नामदेव ढसाळ. त्यावेळी तिथे राम पटवर्धन बसले होते. ते सत्यकथाचे कार्यकारी संपादक होते. त्यावेळी ते मला म्हणाले अर्जुनराव त्या मुलाला बोलवा. त्यांनी त्यांचं कार्ड दिलं आणि नंतर पुढील महिन्यात सत्यकथेत नामदेव यांच्या पाच कविता प्रसिद्ध झाल्या. सत्यकथेत कविता प्रसिद्ध होणे ही मनाची गोष्ट होती '' 


ढसाळांच्या आठवणी सांगताना झाले भावुक 


यावेळी नामदेव ढसाळ यांच्या आठवणी सांगताना अर्जुन डांगळे भावुक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. ते म्हणाले, त्या साहित्य संमेलन ते शेवटी ढसाळ या जगाचा निरोप घेईपर्यंत आमची मैत्री राहिली. ते महान कवी होते. याचा मला अभिमान आहे.